Ashok Gehlot : "पोलीस आणि निमलष्करी दलाच्या ट्रकमध्ये भरुन भाजपा कार्यालयात पोहचवला जातो दोन नंबरचा पैसा"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 03:06 PM2022-08-16T15:06:57+5:302022-08-16T15:25:40+5:30
Ashok Gehlot And BJP : गोवा, अरुणाचल प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश या राज्यांतील सरकारे ही कांदा बटाट्यांनी पडलेली नाहीत असं म्हणत अशोक गेहलोत यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot)यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. निमलष्करी दल आणि पोलिसांच्या ट्रकमध्ये भरुन दोन नंबरचा पैसा हा भाजपा कार्यालयात पोहचवला जातो, असा गंभीर आरोप गेहलोत यांनी केला आहे. जयपूरमध्ये पार पडलेल्या काँग्रेसने आयोजित केलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात अशोक गेहलोत यांनी हे गंभीर आरोप केले आहेत.
गोवा, अरुणाचल प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश या राज्यांतील सरकारे ही कांदा बटाट्यांनी पडलेली नाहीत असं म्हणत अशोक गेहलोत यांनी टीकास्त्र सोडलं आहे. नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी केली. ज्या 500-1000 च्या नोटा जास्त जागा घेत होत्या, त्यात यांनी बंद केल्या, हा कॉमन सेन्सचा भाग आहे. यांनी 1000 रुपयांची नोट बंद करुन 2000 रुपयांच्या नोटा का सुरू केल्या. रुपयांची जी वाहतूक करण्यात येते, त्यात 2000 रुपयांच्या नोटा कमी जागा घेतात, त्यामुळेच हे करण्यात आले असं म्हणत जोरदार निशाणा साधला आहे.
"हे काय करतात तुम्हाला माहीत आहे का? ज्या राज्यात भाजपाची सरकारे आहेत, हे तिथे निमलष्करी दल किंवा पोलिसांना पकडतात. त्या निमलष्करी दलांच्या ट्रकमधून पैसा आणला जातो. हा ट्रक भाजपाच्या कार्यालयाच्या मागे नेला जातो. गाडी पोलीस किंवा निमलष्करी दलाची असेल तर त्या गाडीला पकडणार कोण, लोकांना वाटते त्यांचे पोलीसदल आले आहे, त्यांना मदत करण्यासाठी. हे देशात सुरू असलेलं मोठं षडयंत्र असल्याचा गंभीर आरोपही अशोक गेहलोत यांनी केला आहे.
"मोदी सरकार स्वातंत्र्य सैनिकांचे महान बलिदान तुच्छ लेखण्याचं काम करतंय"
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Congress Sonia Gandhi) यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "केंद्रातील मोदी सरकार आत्ममग्न सरकार आहे. गांधी, नेहरू आणि पटेल आणि स्वातंत्र्याबाबत खोटा इतिहास सांगितला जात आहे. स्वातंत्र्य सैनिकांचे महान बलिदान आणि गौरवशाली यशाला तुच्छ लेखण्याचं काम करत आहे" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. देशात खोटा इतिहास सांगून संभ्रम निर्माण केला जात आहे. आम्ही त्याचा जोरदार विरोध करू, असा इशारा सोनिया गांधी यांनी दिला आहे.