जयपूर - अशोक गहलोत यांची काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदासाठी चाचपणी सुरू झाली आहे. रविवारी राजस्थानच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाचा निर्णय होणार होता. त्यासाठी आमदारांची बैठकही बोलावण्यात आली होती. मात्र हा निर्णय होण्यापूर्वीच एकाएकी काँग्रेसच्या तब्बल ८२ आमदारांनी राजीनामा देत खळबळ उडवून दिली आहे. त्यानंतर काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी अशोक गहलोत यांच्याशी चर्चा केली. मात्र गहलोत यांनी हात वर केले. दरम्यान, अशोक गहलोत यांच्या समर्थकांनी काँग्रेस हायकमांडसमोर तीन अटी ठेवल्या आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसच्या आमदारांनी हायकमांडसमोर तीन अटी ठेवण्यात आल्या आहेत. सूत्रांनी सांगितले की, या अटींवर एकमत होत नाही तोवर कुठलाही आमदार बैठकीला हजर राहणार नाही.
काँग्रेसच्या नाराज असलेल्या आमदारांनी हायकमांडसमोर ठेवलेल्या अटी पुढीलप्रमाणे आहेत. - अशोक गहलोत हे अध्यक्षपदी निवडून आल्यानंतरच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील. म्हणजेच मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची घोषणा ही १८ ऑक्टोबरनंतर करण्यात यावी. - जी व्यक्ती मुख्यमंत्री बनेल ती त्या १०२ आमदारांमधील असेल ज्यांनी २०२० मध्ये सचिन पायलट यांच्या बंडावेळी सरकार कोसळण्यापासून वाचवले होते.- मुख्यमंत्रिपदासाठी अशोक गहलोत यांचा पर्याय दिला गेला पाहिजे.
राजस्थान सरकारमधील मंत्री महेश जोशी यांनी सांगितले की, हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर प्रत्येक आमदाराला विश्वास आहे. आम्ही आमचं म्हणणं मांडलं आहे. आता हायकमांड अंतिम निर्णय घेताना आमच्या म्हणण्याचा विचार करेल, अशी अपेक्षा आहे. काँग्रेसशी निष्ठावंत असणाऱ्यांची पक्षाने काळजी घ्यावी, असे आम्हाला वाटते. दरम्यान, काही नाराज आमदारांनी सी.पी. जोशी यांना मुख्यमंत्री बनवण्याची मागणी केली आहे.
दुसरीकडे या घटनाक्रमांची सोनिया गांधी यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी आमदारांशी समोरासमोर चर्चा करण्याची सूचना अजय माकन आणि मल्लिकार्जुन खर्गे यांना दिली आहे. तसेच अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांना दिल्लीत बोलावून घेतलं आहे.