जयपूर - आपल्या लग्नाच्या प्री वेडिंगचा व्हिडीओ एका पोलीस अधिकाऱ्याला चांगलाच महागात पडला आहे. लाचखोरीच्या आश्चर्यजनक प्रकरणात राजस्थानपोलिसांनी एका कर्मचाऱ्याला नोटीस बजावली आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यान नाराजी व्यक्त केली आहे. राजस्थान पोलीसमध्ये कार्यरत असलेल्या धनपत यांच्याबाबतीत हा प्रकार घडला आहे.
धनपत यांनी आपल्या भावी पत्नीसोबतच्या प्री वेडिंगचा एका व्हिडीओ शुट केला होता. पत्नी किरणसोबत त्यांनी या व्हिडीओग्राफीतून पोलिसांच्या प्रतिमेला धक्का पोहोचविल्याचे सांगत धनपत यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या प्री वेडिंग व्हिडीओमध्ये धनपत हे भावी पत्नी किरण हिच्यासमवेत आनंद साजरा करताना दिसत आहेत. मात्र, या व्हिडीओतील एका दृश्याला पोलीस विभागाने आक्षेप घेतला आहे. त्यानुसार, विना हेल्मेट स्कुटी चालविणाऱ्या किरणला ट्रॅफिक पोलीस अधिकारी असणारे धनपत जागीच थांबवतात. त्यानंतर, स्कुटीचालक किरण, आपल्या जवळील पैसे ट्रॅफिक पोलीस धनपत यांच्या खिशात टाकताना दिसत आहे. तर, धनपत यांच्या खिशातून पॉकेट चोरतानाही दिसून येते. विशेष म्हणजे यावेळी धनपत यांनी पोलीसाचा गणवेश परिधान केला आहे. या भेटीनंतर दोघांमध्ये प्रेम होते, असा प्री वेडिंग व्हिडीओ धनपत आणि किरण यांनी बनवला आहे.
धनपत आणि किरण यांच्या या प्री वेडिंग व्हिडीओतून पोलिसांची प्रतीमा मलीन होत असल्याचं पोलीस विभागाने म्हटलं आहे. कारण, यामध्ये ट्रॅफिक पोलिसांच्या लाचखोरीला दर्शविण्यात आलं आहे. धनपत हे उदयपूर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. धनपत यांनी युट्यूबवर हा व्हिडीओ अपलोड केल्यानंतर आपल्या सहकारी मित्रांना दाखवला होता. त्यानंतर, संबंधित खात्यातील अधिकाऱ्यांपर्यंत हा व्हिडीओ पोहोचला. मात्र, वरिष्ठ अधिकारी हा व्हिडीओ पाहून नाराज झाले आहेत. पोलिसांच्या वर्दीचा हा अपमान असल्याचं संबंधित अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. उदयपूर येथील आयजी डॉ. हवासिंह घुमरिया यांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर, सर्वच क्षेत्रातील इन्स्पेक्टर जनरल यांना नोटीस जारी केली आहे. पोलिसांच्या गणवेशाचा दुरुपयोग केल्यानंतर, संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, असे या आदेशात म्हटले आहे.