जयपूर - राजस्थानची राजधानी जयपूर येथून धक्कादायक वृत्त समोर आले आहे. राजस्थानात कोरोना लशींच्या तुटवड्यानंतर, आता लशींची चोरीही होऊ लागली आहे. जयपूरमधील एका सरकारी रुग्णालयातून को-व्हॅक्सीनच्या (covaxin) तब्बल 320 डोसची चोरी झाल्याचे समोर आले आहे. यानंतर आरोग्य विभागाने अज्ञात चोरांविरोधात गुन्हाही दाखल केला आहे. याशिवाय, अवैधरित्या लस देणारे रॅकेट तर सक्रीय झाले नाही ना, यासंदर्भातही आरोग्य विभाग तपास करणार आहे. (Rajasthan corona virus 320 doses vaccines stolen from jaipur hospital)
कोरोना लशीची चोरी होण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे. महत्वाचे म्हणजे, सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, ज्या ठिकाणावरून लशीची चोरी झाली, त्या ठिकाणचा सीसीटीव्ही कॅमेराच काम करत नसल्याचे समोर आले आहे. यामुळे रुग्णालयातीलच एखाद्या कर्मचाऱ्याच्या सहाय्याने ही चोरी झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
1 कोटीहून अधिक लोकांना लस देणारे राजस्थान दुसरे राज्य -सोमवारी दुपारपर्यंत एक कोटींहून अधिक लोकांना लस देणारे राजस्थान हे देशातील दुसरे राज्य ठरले आहे. राज्यातील आरोग्य मंत्री डॉ. रघू शर्मा यांनी यासाठी राज्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे अभिनंदनही केले आहे. एवढेच नाही, तर राज्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर लसीकरण करून घेण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले आहे.
चार दिवसांत रोज सरासरी 4.70 लाख लोकांना टोचण्यात आली लस -गेल्या चार दिवसांत रोज सरासरी 4.70 लाख लोकांना लस देण्यात आली आहे. 5 एप्रिलला एकूण 5.44 लाख जणांना, 6 एप्रिलला 4.84 लाख जणांना, 7 एप्रिलला 5.81 लाख जणांना, 8 एप्रिलला 4.65 लाख जणांना, 9 एप्रिलला 4.21 लाख जणांना, 10 एप्रिलला 2.96 लाख जणांना, 11 एप्रिलला 1.11 लाख जणांना कोरोनाची लस देण्यात आली."आणखी अनेक वर्षं कोरोनापासून सुटका नाही, कोवीड-१९चं नवं रूप संकटांचा संकेत!"