दौसा: मृत्यूच्या दाढेतून बचावणं कशाला म्हणतात त्याचा प्रत्यय देणारी घटना राजस्थानातल्या दौसामध्ये घडली आहे. तीन तरुण रस्त्यावरून जात असताना शेजारी असलेली एक भली मोठी भिंत कोसळली. भिंत कोसळत असताना तिन्ही तरुण तिथून पळाले आणि मोठा अनर्थ थोडक्यात टळला. अवघ्या काही सेकंदांचा फरक तरुणांसाठी लाखमोलाचा ठरला. हा संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाला आहे.
दौसा येथील बजरंग मैदानाजवळ सोमवारी संध्याकाळी पावणे सातच्या सुमारास ही घटना घडली. त्यावेळी तीन मित्र तिथून जात होते. गप्पा मारत मित्र निवांत चालत असताना अचानक रस्त्याच्या कडेला असलेली भिंत कोसळली. भिंत कोसळत असल्याचं तरुणांच्या अगदी वेळीच लक्षात आलं. तिघेही जीव वाचवण्यासाठी सुरक्षित अंतरावर धावले. त्यामुळे भिंतीखाली येण्यापासून ते थोडक्यात वाचले. भिंतीच्या शेजारी उभ्या असलेल्या गाडीचं प्रचंड नुकसान झालं.
भिंत रस्त्यावर कोसळताच परिसरात धुळीचं साम्राज्य पसरलं. यावरून भिंत किती मोठी येईल याचा अंदाज येऊ शकतो. तीन मित्र दुर्घटनेतून थोडक्यात बचावले. यानंतर परिसरातील लोक घटनास्थळी जमले. थोड्या वेळात पोलीसदेखील घटनास्थळी पोहोचले. कोसळलेली भिंत फार जुनी असल्याचं सांगितलं जात आहे. कोसळणारी भिंत आणि त्यातून थोडक्यात वाचलेल्या तरुणांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.