सीकर: राजस्थानमधील एका डॉक्टरांच्या कुटुंबाचा अपघाती मृत्यू झाला आहे. सीकर जिल्ह्यातील रिंगसमध्ये वास्तव्यास असलेले डॉ. सतीश पुनिया, त्यांची पत्नी सरिता, मुलगा दक्ष, मुलगी राजवी, मेहुणा राजेश, त्याची पत्नी आणि मुलगी राजश्री यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. अपघातात ७ जणांचं निधन झालं. डॉक्टरांचं कुटुंब हिमाचल मनालीला फिरायला गेले होते. तिथून परतत असताना पंजाबमधील रोपडमध्ये त्यांच्या कारला भीषण अपघात झाला.
पिकनिक संपवून घरी परतत असताना सोमवारी डॉक्टरांच्या हुंडाई क्रेटा कारला एका खासगी बसनं धडक दिली. कार भाकरा कालव्यात जाऊन पडली. यानंतर बसचा चालक फरार झाला. धडक इतकी भीषण होती की कार ३५ फूट घासत रेलिंग तोडून कालव्यात पडली. यानंतर पाणबुड्यांना पाचारण करण्यात आलं. तीन तास प्रयत्न केल्यानंतर कार बाहेर काढण्यात यश आलं. पाच जणांचे मृतदेह हाती लागले. तर राजवी आणि राजश्री कालव्यात वाहून गेले. त्यांचा शोध सुरू आहे.
डॉ. सतीश पुनिया रिंगस येथील सरकारी रुग्णालयात कार्यरत होते. त्यांची पत्नी सरिता शाळेत शिक्षिका होती. आपण आज रुग्णालयात येऊ शकणार नाही अशी माहिती सतीश पुनिया यांनी रिंगस सीएचसी प्रभारी डॉक्टर विनोद गुप्ता यांना सोमवारी सकाळी ८ वाजता फोन करून दिली होती. डॉ. पुनिया १३ एप्रिलपर्यंत ड्युटीवर होते. त्यानंतर त्यांनी ४ दिवसांची सुट्टी घेतली होती. ते कुटुंबासोबत फिरायला गेले होते.