काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. कोरोनाच्या काळात जेव्हा देशभरात लोकांचा मृत्यू होत होता तेव्हा मोदी थाळी वाजवायला सांगत होते. यासोबतच पंतप्रधान भांडवलदारांसाठी काम करत असल्याचा आरोपही राहुल गांधींनी केला आहे.
राजस्थानमधील चुरू येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी "इथे आम्ही गरीबांचे सरकार चालवतो, आम्ही तुमचे संरक्षण करतो. त्याचवेळी नरेंद्र मोदींनी जीएसटी लागू केला आणि पहिल्यांदाच देशातील शेतकऱ्यांना कर भरावा लागला. त्यांनी (मोदी) नोटाबंदी केली आणि सर्व छोट्या व्यापाऱ्यांना उद्ध्वस्त केलं" असं म्हटलं आहे.
"काँग्रेसचं सरकार म्हणजे शेतकऱ्यांचं, मजुरांचं सरकार"
"आज लोक पंतप्रधान मोदींनी दिलेल्या आश्वासनांवर हसतात. 15 लाख रुपये देण्याचे आश्वासन दिलं होतं. लोकांना ते मिळाले का? मोदींचा हमीभाव म्हणजे अदानीचा हमीभाव आणि काँग्रेसचे सरकार म्हणजे शेतकरी आणि मजुरांचे सरकार आहे."
"तुम्हाला अदानींचं सरकार हवं आहे की शेतकरी, मजूर आणि तरुणांचं? राजस्थान सरकारने लोकांसाठी खूप काम केलं असून भाजपा सरकार सत्तेवर आल्यास ते हे सर्व काही उद्ध्वस्त करतील आणि अब्जाधीशांसाठी काम करतील" असा दावा राहुल गांधी यांनी केला.
"मोदी श्रीमंतांसाठी काम करतात"
"जिकडे पाहावे तिकडे अदानी काही ना काही उद्योग करत आहेत. विमानतळ, बंदरं, सिमेंट प्लांट, रस्ते सर्व त्यांच्या मालकीचं आहे. मोदी श्रीमंतांसाठी काम करतात. ते अदानीला मदत करतात, अदानी पैसे कमवतात आणि तो पैसा परदेशात वापरला जातो."
"नरेंद्र मोदींनी कृषी कायदा आणला आणि त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल, असं सांगितले, पण देशातील सर्व शेतकरी त्याविरोधात संपावर बसले. शेतकरी म्हणाले, हा आमचा कायदा नाही, अदानी-अंबानींचा कायदा आहे. शेवटी काँग्रेसने शेतकऱ्यांसह हा कायदा रद्द केला" असं म्हणत राहुल गांधींनी हल्लाबोल केला आहे.