कठोर परिश्रम केले की यश आपसुकच मिळतं. राजस्थानमधील एका शेतकऱ्याच्या मुलाने हे सिद्ध करून दाखवलं आहे. त्याची आई मनरेगामध्ये रोजंदारीवर काम करायची आणि वडील शेतकरी होते, त्यामुळे घर चालवणं अवघड होतं. हेमंत पारीक असं या मुलातं नाव असून त्याच्या आईला मजुरी म्हणून २०० रुपये मिळायचे, पण तिला कधी ६० रुपये तर कधी ८० रुपये मिळायचे.
एके दिवशी आईने तिच्या मुलाला तिची वेदना सांगितली. त्यानंतर हेमंतने त्या लोकांना याचा जाब विचारला तेव्हा तुम्ही कलेक्टर आहात का? असं विचारून हेमंतला तिथून हाकलून देण्यात आलं. त्या दिवसाआधी हेमंतने कलेक्टर हा शब्दही ऐकला नव्हता. पदवीनंतर नोकरी करून घराची जबाबदारी घेण्याचा हेमंतचा हेतू होता, पण आईला न्याय मिळवून देण्यासाठी त्याने कलेक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते त्याने पूर्ण केलं.
हेमंतचा जन्म राजस्थानमधील हनुमानगड येथील एका गरीब कुटुंबात झाला. त्याने महर्षी दयानंद शाळेतून हिंदी माध्यमात दहावीपर्यंत शिक्षण घेतलं. त्यानंतर बारावी केली. हेमंतने जेईटी परीक्षा दिली आणि त्यात तो नापास झाला. पुढच्या वर्षी पुन्हा जेईटीची परीक्षा दिली आणि उत्तीर्ण झाला. पण सुरुवातीचे शुल्क भरण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते.
आयसीएआर परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, त्याला जयपूरमधील जोबनेर येथील नरेंद्र कृषी विद्यापीठात प्रवेश मिळाला. काही यूट्यूब चॅनेल्सच्या लिंक्स पाहून हेमंतला कळलं की आयएएसमधून कलेक्टर बनता येतं, मग त्याच दिवशी त्यांनी ठरवलं की एक दिवस कलेक्टर होणार.
पण सर्वात मोठी समस्या म्हणजे आयएएसची तयारी करण्यासाठी पैसे नव्हते, वडील म्हणाले की, तू दिल्लीला जा आणि मनापासून अभ्यास कर, आपण घर विकू. त्या दिवसापासून हेमंतने UPSC-IAS ची तयारी सुरू केली, त्यानंतर परीक्षा उत्तीर्ण झाले आणि नाव यादीत आलं. सततच्या कठोर परिश्रमानंतर, त्याने २०२३ च्या यूपीएससीमध्ये दुसऱ्या प्रयत्नात ऑल इंडिया ८८४ रँक मिळवला.