नवी दिल्ली - कोरोना लॉकडाऊनमध्ये देशातील अनेक नागरिकांना भरमसाठ विजेचं बिल आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अनेकांनी त्याबाबत तक्रारीदेखील दाखल केल्या आहेत. अशीच एक घटना राजस्थानच्या अलवरमध्ये घडली आहे. हजार, बाराशे नव्हे तर तब्बल 3114154015 रुपये बिल आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिन्याच्या बिलाचा हा भलामोठा आकडा पाहून अनेकांना मोठा शॉक बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानचीवीज कंपनी 'जयपुर विद्युत वितरण निगम लिमिटेड' (jvvnl) ने अलवरमधील एका कंपनीला हजारो, लाखो नाही तर तब्बल अब्जावधीचं विजेचं बिल पाठवलं आहे.
नेहमी येणाऱ्या 10 ते 20 हजार रुपये बिलाच्या जागी 3114154015 हा आकडा पाहून कंपनीच्या संचालकाला मोठा धक्काच बसला. एवढंच नाही तर 25 जानेवारीपर्यंत हे वीज बिल भरलं नाही तर पावणे सहा कोटी रुपयांचा दंड भरावा लागणार असल्याचंही सांगितलं आहे. भिवाडी येथील खुशखेडा इंडस्ट्रीअल एरियातील डिझेल पॉवर इंटरनॅशनल कंपनीचं बिल 3 अब्ज 11 कोटी 41 लाख 54 हजार 15 रुपये आलं आहे. बिलाचा आकडा पाहून मालक अनिता शर्मांना धक्काच बसला. अनिता यांनी त्वरीत वीज वितरण कंपनीशी संपर्क केला.
संगणकामध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्याचं शर्मा यांना सांगण्यात आलं. जेव्हीव्हीएनएलच्या वेबसाईटवरून पुन्हा एकदा नवीन बिल मागवण्यात आलं. नव्या बिलात ही रक्कम 226134 रुपये झाली. अनिता शर्मा यांनी हे बिल देखील चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. त्याचं बिल हे साधारण 22 हजारच्या जवळपास असल्याचं म्हटलं आहे. एकंदरीत वीज कंपनीच्या प्रणालीत असलेल्या त्रुटी, त्यात तब्बल दहापट जास्त बिल आकारण्यात आलेलं पाहून वीज कंपनीवर प्रश्न उपस्थित करण्यात आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
वीज विभागाचा कारनामा! फ्लॅटची किंमत 7 लाख पण विजेचं बिल आलं तब्बल 77.31 लाख
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. याच दरम्यान भरमसाठ विजेचं बिल आल्याची तक्रार अनेक लोकांनी केली आहे. अशीच एक घटना हरियाणामध्ये घडली आहे. सात लाख किंमत असलेल्या फ्लॅटचं बिल तब्बल 77 लाख आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विजेच्या मीटरचं रीडिंग दाखल केलेल्या दक्षिण हरियाणा वीज वितरण निगमकडून (डीएचबीवीएन) ग्राहकांना विजेचं बिल पाठवलं जात आहे. त्याचवेळी हा अजब प्रकार समोर आला आहे.
सेक्टर 57 मधील हाऊसिंग बोर्डाच्या तब्बल 200 चौरस फूट असलेल्या ईडब्ल्यूएक फ्लॅटचं दोन महिन्याचं विजेचं बिल तब्बल 77,31 लाख रुपये आलं आहे. हाऊसिंग बोर्डाच्या ईडब्ल्यूएस कॉलनीतील घर क्रमांक 373 च्या तळ मजल्यावर गोपाळ राम राहतात. त्यांना तब्बल 77.31 लाख रुपये विजेचं बिल आलं आहे. 4 जानेवारीपर्यंत बिल भरण्याची नोटीस देण्यात आली आहे. यानंतर वीज बिल न भरल्यास सुमारे 2.24 लाख रुपयांचा दंड आकारला जाईल. याआधीही चुकीचं वीज बिल आलं असल्याची माहिती समोर आली आहे.
दुसऱ्याच्या शेतात मजुरी करणाऱ्या शेतकऱ्याला आलं तब्बल 26 लाखांचं बिल
गंगा घाट पोलीस स्टेशन परिसरातील बेहटा गावात राहणारे रामू राठोड यांच्या घरी 26 लाख रुपयांचं विजेचं बिल आलं होतं. एवढं मोठं बिल पाहून शेतकरी रामू राठोड यांच्या कुटुंबाला धक्का बसला. तेव्हापासून शेतकरी वीज विभागाच्या फेऱ्या मारत आहे. मात्र कोणीही त्याचं म्हणणं ऐकून घ्यायला तयार नाही. स्वतःची जमीन नाही आणि पाच मुलींचं लग्न करायचं आहे. मला 26 लाख रुपयांचं बिल कसं आलं हे काहीच कळत नाही. अधिकाऱ्यांना याबद्दल सांगितलं तर ते केवळ आश्वासनं देत आहेत, याकडे कोणीही गांभीर्याने पाहत नाही असं रामू राठोड यांनी म्हटलं होतं.