राजस्थान विधानसभा निवडणुकांपूर्वी सत्ताधारी काँग्रेस पक्षाला राज्यात झटका बसण्याची शक्यता आहे. राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायल काँग्रेसचा हात सोडून आपल्या नव्या मार्गावर चालण्याच्या तयारीत दिसत आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोतत यांच्यासोबत सुरू असलेल्या राजकीय वर्चास्वाच्या लढाईला आता वेगळंच वळण लागणार असल्याचं चित्र निर्माण झालंय. दरम्यान, सचिन पायलट आपला नवा पक्ष सुरू करू शकतात अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार प्रशांत किशोर यांची राजकीय सल्लागार फर्म I-PAC पायलट यांची मदत करत आहे. यापूर्वी ११ एप्रिल रोजी त्यांच्या एक दिवशी उपोषणाची योजना आखण्यातही या फर्मच्या वॉलिंटियर्सनं त्यांची मदत केल्याचं म्हटलं जातं. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या कार्यकाळात झालेल्या कथित भ्रष्टाचारावर कोणतीही कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ हे उपोषण करण्यात आलं होतंयाच फर्मनं पायलट यांच्या पाच दिवसीय पदयात्रेचा कार्यक्रमही तयार केला होता. त्यावेळी त्यांनी भर्ती परीक्षांमध्ये प्रश्नपत्रिका फुटल्याच्या घटनेवर कारवाईसाठी अजमेर ते जयपूरपर्यंत पदयात्रा केली होती.
वसुंधरा राजे यांच्या कार्यकाळातील कथित भ्रष्टाचार, राजस्थान लोक सेवा आयोगाची पुनर्स्थापना, पेपरफुटीमुळे प्रभावित झालेल्या तरुणांना नुकसान भरपाई द्यावी अशा मागण्या पायलट यांनी केल्या होत्या. यासाठी त्यांनी ३१ मे पर्यंतची वेळ दिली होती. तसंच मागण्या पूर्ण न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला होता.
११ जूनला नवा पक्ष?११ जून रोजी सचिन पायलट आपले वडील राजेश पायलट यांच्या पुण्यतिथी दिनी एक मोठी घोषणा करण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जातंय. यादिवशी ते एक रॅली करणार आहेत. तसंच ते आपला पक्ष सुरू करण्याच्या तयारीत असल्याचंही म्हटलं जातंय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजस्थानमध्ये दोन पक्षांची नोंदणी झाली आहे. यापैकी एका पक्षाचं नाव प्रगतीशील काँग्रेस आणि दुसऱ्या पक्षाचं नाव राज जन संघर्ष पार्टी आहे. या दोन्हीपैकी एका पक्षाच्या नावाची घोषणा पायलट करू शकतात.