चित्तौडगड - राजस्थानातील चित्तोडगड जिल्ह्यात रावतभाटा भागात शनिवारी एक मोठी घटना घडली. येथील तमलाव गावात तलावात आंघोळ करताना चार मुलींचा बुडून मृत्यू झाला आहे. या चौघीही तलावात आंघोळीसाठी गेल्या होत्या. या वेळी पाय घसरल्याने त्या तलावात बुडाल्या आणि त्यांचा मृत्यू झाला. (four sister drowned in Lake in Rajasthan)
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या भागातील तमलाव येथील रहिवासी पप्पू सिंह राजपूत यांच्या दोन मुली आशा आणि निशा तसेच त्यांचा भाऊ सुरेंद्र सिंह राजपूत यांच्या मुली चिंकी आणि निकी गावा बाहेरील तालावात आंघोळीसाठी गेल्या होत्या. तेथे एक मुलगी पाय घसरल्याने तलावात बुडू लागली. तिला वाचविण्याच्या प्रयत्नात इतर तीन बहिणीही तालावात बुडाल्या. या मुली दुपारपर्यंतही घरी न परतल्याने कुटुंबीय तलावावर पोहोचले, तेव्हा, मुली तलावात बुडाल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांत घटनेची माहिती देण्यात आली.
संपूर्ण गावावर शोककळा -माहिती मिळताच मोठ्या संख्येने ग्रामस्थ घटनास्थळी जमले होते. गावकऱ्यांनी आणि पोलिसांनी बोलावलेल्या लोकांनी दुपारच्या सुमारास या चारही मुलींचे मृतदेह तलावातून बाहेर काढले. यानंतर, त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रावतभाटा रुग्णालयात आणून, नंतर नातलगांना सोपविण्यात आले. या चारही मुलींचे वय दहा ते बारा वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावावरच शोककळा पसरली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.