राजस्थानमधील बिकानेर शहरात झालेल्या एका दुर्दैवी घटनेत, ज्युनियर नॅशनल गेम्सच्या सुवर्णपदक विजेत्या महिला पॉवरलिफ्टरचा सराव दरम्यान मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत पॉवरलिफ्टरचे नाव यष्टिका आचार्य असे आहे. ती १७ वर्षांची होती. ही घटना घडली तेव्हा यष्टिका जिममध्ये वेटलिफ्टिंगचा सराव करत होती. यावेळी तिच्या मानेवर रॉड पडल्याने तिचा मृत्यू झाला. या घटनेत तिच्या प्रशिक्षकालाही दुखापत झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यष्टिका जिममध्ये सराव करत असताना हा अपघात झाला. यावेळी ती २७० किलो वजनाच्या प्लेट्स बसवलेला रॉड उचलण्याचा प्रयत्न करत होती. यासंदर्भात माहिती देताना नया शहरचे एसएचओ विक्रम तिवारी म्हणाले, मंगळवारी ज्युनियर नॅशनल गेम्समधील सुवर्णपदक विजेत्या महिलेवर २७० किलो वजनाचा रॉड पडल्याने तिची मान तुटली.
तिवारी म्हटले आहे की, घटनेनंतर, लगेचच तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात पोहोचल्यानंतर, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घटनेच्या वेळी ट्रेनर जिममध्ये यष्टिकाकडून वजन उचलण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान, जिम ट्रेनरलाही सौम्य दुखापत झाली आहे.
संपूर्ण घटना व्हिडिओत कैद -या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, यात, यष्टिका तिच्या मानेच्या मागच्या बाजूला २७० किलो वजनाचा रॉड ठेवून स्वतःचा तोल सावरण्याचा प्रयत्न करत आहे. तेवढ्यात तिचा तोल जातो आणि ती मागे सरकते. याच वेळी, रॉड तिच्या मानेवर येतो आणि ती बेशुद्ध होते. याच दरम्यान तिचा मृत्यू होतो.
यष्टिका मुळची बीकानेर येथील आचार्य चौक येथील रहिवासी होती. तिचे वडील ऐश्वर्य आचार्य हे पेशाने ठेकेदार आहेत. दरम्यान, या घठनेसंदर्भात तिच्या कुटुंबीयांनी कुठल्याही प्रकारची तक्रार दाखल केलेली नाही. तसेच शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांना सोपवला जाईल, असे पोलिसींनी म्हटले आहे.