‘राजस्थानातील सरकार कोसळू शकते’
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 04:32 AM2019-07-14T04:32:45+5:302019-07-14T04:33:03+5:30
कर्नाटक आणि गोव्यातील घटनेची पुनरावृत्ती राजस्थानमध्ये होत असल्याचा दावा भाजपच्या एका नेत्याने केला आहे.
जयपूर : कर्नाटक आणि गोव्यातील घटनेची पुनरावृत्ती राजस्थानमध्ये होत असल्याचा दावा भाजपच्या एका नेत्याने केला आहे. राजस्थानातील सरकार कोसळू शकते, असाही दावा भाजपचे आमदार वासुदेव देवनानी यांनी केला आहे.
विधानसभा परिसरात मीडियाशी बोलताना आमदार वासुदेव देवनानी म्हणाले की, राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसचे आमदार धास्तावलेले आहेत. मुख्यमंत्री गेहलोत यांना असुरक्षित वाटत आहे. त्यामुळे ते असे विधान करत आहेत की, राज्यातील लोक त्यांनाच मुख्यमंत्रीपदी ठेवू इच्छितात. जर गावागावातील लोकांची अशी इच्छा आहे, तर ते त्यांना स्वत:च्या बूथवर पराभव का स्वीकारावा लागला?
आमदार वासुदेव देवनानी म्हणाले की, राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर गेहलोत यांच्या नावाची अध्यक्षपदासाठी चर्चा होती. मात्र, गेहलोत यांनी स्पष्ट केले की ते जाण्यासाठी अनिच्छुक आहेत.
भाजपचे आमदार अशोक लाहोटी म्हणाले की, गेहलोत यांनी १० जुलै रोजी सादर केलेले बजेट हे शेवटचे असेल. गेहलोत काही दिवसांत दिल्लीला रवाना होतील. दोन महिन्यात राजस्थानात राजकीय अस्थिरता निर्माण होईल.
भाजपचे आमदार कालिचरण सराफ म्हणाले की, राजस्थानात मध्यावधी निवडणुका होऊ शकतात. गेहलोत आणि पायलट यांच्यातील अंतर्गत वादामुळे सरकार धोक्यात आहे आणि ते कधीही कोसळू
शकते.
>‘आमचे आमदार धोका देणार नाहीत’
राज्यातील गेहलोत यांच्या सरकारला कोणताही धोका नाही, असे मंत्री बी.डी. कल्ला यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, भाजप एकीकडे नैतिकतेच्या गोष्टी करतो आणि दुसरीकडे लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करतो. काँग्रेसचे आमदार प्रशांत बैरवा म्हणाले की, काँग्रेसचे आमदार पक्षाला धोका देणार नाहीत.