वीर सावरकरांवरुन पुन्हा राजकारण, दहावीच्या अभ्यासक्रमात काँग्रेसने केला बदल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 10:37 AM2019-05-14T10:37:49+5:302019-05-14T10:38:40+5:30
तीन वर्षापूर्वी भाजपा सरकारच्या काळात विनायक दामोदर सावकर यांचा स्वातंत्र्यवीर आणि महान देशभक्त असा उल्लेख करण्यात आला होता. मात्र नव्याने स्थापन झालेल्या काँग्रेसने शालेय अभ्यासक्रमात वीर सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली होती असा उल्लेख करण्यात आला आहे.
जयपूर - राजस्थान सरकारच्या शिक्षण विभागाने दहावीच्या अभ्यासक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील धड्यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. तीन वर्षापूर्वी भाजपा सरकारच्या काळात विनायक दामोदर सावकर यांचा स्वातंत्र्यवीर आणि महान देशभक्त असा उल्लेख करण्यात आला होता. मात्र नव्याने स्थापन झालेल्या काँग्रेसने शालेय अभ्यासक्रमात वीर सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली होती असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरुन नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.
राजस्थान सरकारने अभ्यासक्रम निश्चित करण्यासाठी एक समिती गठित केली होती. या समितीच्या शिफारशींवरुन पाठ्यक्रमात बदल करण्यात आल्याचा दावा राजस्थानमधील शिक्षण मंत्री गोविंद सिंह दोतासरा यांनी केला आहे. दोतासरा यांनी सांगितले की, मागील सरकारच्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या व्यतिरिक्त अन्य स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांच्या योगदानाला महत्त्व दिलं नाही. मात्र पाठ्यपुस्तकात केलेल्या बदलावर भाजपाने आक्षेप घेतला आहे. वीर सावरकरांच्या धड्यात बदल करणे म्हणजे वीर सावरकरांचा अपमान असल्याची टीका भाजपाने काँग्रेस सरकरावर केली आहे.
भाजपा सरकारच्या काळात सावरकरांच्या धड्याची सुरुवात वीर सावरकर एक महान क्रांतिकारी, देशभक्त आणि संघटनवादी नेते होते. त्यांनी आजीवन देशाच्या स्वातंत्र्यासाठी तप आणि त्याग केला. त्यांचे कौतुक शब्दांमध्ये करता येणार नाही. सावरकरांनी देशातील जनतेने स्वातंत्र्यवीर उपाधी दिली होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1904 मध्ये अभिनव भारत या संघटनेची स्थापना केली होती असं भाजपाच्या काळातील अभ्यासक्रमात नमुद करण्यात आलं होतं.
Rajasthan Education Min, GS Dotasara: People like Veer Savarkar who didn't have any contribution to independence movement were glorified in books, when our govt came to power, committee was formed that analysed things&now whatever is in books, it's based on solid evidence. pic.twitter.com/aOSuruzx9I
— ANI (@ANI) May 13, 2019
मात्र राजस्थानमध्ये काँग्रेस सरकार सत्तेत आल्यानंतर सावरकरांवरील धड्यात बदल करण्यात आला आहे. जेलमध्ये होत असलेल्या त्रासाला कंटाळून वीर सावरकरांनी ब्रिटिश सरकारकडे चार वेळा दयेची याचिका पाठवली त्यात त्यांनी सरकारच्या अनुसार काम करण्याची आणि स्वत:ला पोर्तुगालचा मुलगा असल्याचं सांगितल्याचा उल्लेख केला. ब्रिटिश सरकारने सावरकरांची याचिका स्वीकारत 1921 मध्ये त्यांना जेलमधून मुक्त केलं. तेथून सुटल्यानंतर सावरकरांनी हिंदू महासभेत प्रवेश करत देशाला हिंदूराष्ट्र बनविण्याची संकल्पना आखली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सावरकरांनी ब्रिटिश सरकारला मदत केली. 1942 च्या भारत छोडो या आंदोलनाला सावरकरांनी विरोध केला होता. तसेच महात्मा गांधी यांच्या हत्येमध्ये मुख्य आरोपी नथुराम गोडसेला मदत करण्याच्या आरोपाचा खटलाही सावरकरांवर सुरु होता. त्यातून सावरकरांची मुक्तता झाली असा उल्लेख नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे.