अलिगडः राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंह यांनी केलेल्या विधानावरून ते विरोधकांच्या टीकेचे धनी झाले आहेत. अलिगडमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी भाजपाला लोकसभा निवडणुकीत विजय मिळायला हवा, अशी इच्छा व्यक्त केली आहे. तसेच नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान झालेलं पाहायला आवडेल, असं विधानही त्यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानांवरून विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला. कल्याण सिंह 23 मार्च रोजी अलिगडमध्ये पत्रकारांशीच बोलताना म्हणाले, आम्ही सर्वच लोक भाजपाचे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे भाजपा पुन्हा विजयी होऊन मोदी पंतप्रधान झालेलं पाहायला आम्हाला आवडेल. त्यांचं पुन्हा पंतप्रधान बनणं हे देश आणि समाजासाठी गरजेचं आहे.अलिगडमध्ये भाजपानं जाहीर केलेले उमेदवार आणि विद्यमान खासदार सतीश कुमार गौतमचे स्थानिक कार्यकर्ते विरोध करत आहेत. कल्याण सिंह यांनी भाजपाच्या नाराज कार्यकर्त्यांना उद्देशून हे विधान केलं होतं. परंतु या विधानानंतर ते अडचणीत सापडले आहे. राज्यपाल हे एक संवैधानिक पद आहे. या पदावर विराजमान व्यक्तीनं कोणत्याही राजकीय पक्षाची बाजू घेणं योग्य नाही. 87 वर्षीय कल्याण सिंह हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आहेत. 6 डिसेंबर 1992मध्येही अयोध्येतील बाबरी पाडण्याच्या वेळी ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते.या घटनेनंतर कल्याण सिंह सरकार बरखास्त करण्यात आलं होतं. 1999मध्ये त्यांनी भाजपा सोडून जनक्रांती पक्षाची स्थापना केली. परंतु कालांतरानं त्यांनी जनक्रांती पक्ष भाजपामध्ये विलीन केला. 2014मध्ये केंद्रात भाजपा सरकार आल्यानंतर कल्याण सिंह यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे पुत्र राजवीर सिंह एटा लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. कल्याण सिंह यांचे नातू संदीप सिंह उत्तर प्रदेशमधल्या योगी आदित्यनाथ सरकारमध्ये शिक्षा राज्यमंत्री आहेत.
राज्यपाल कल्याण सिंह म्हणे, आम्ही सर्व भाजपाचे कार्यकर्ते, मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 4:01 PM