नवी दिल्ली - देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ४५ हजार २०९ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ५०१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या ९० लाख ९५ हजार ८०७ वर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा १ लाख ३३ हजार २२७ र गेला आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशनंतर आता आणखी एका राज्यात नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. तसेच मास्क न लावल्यास दंड भरावा लागणार आहे.
राजस्थानमधील आठ शहरांमध्ये नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. तसेच मास्क न घातल्यास 500 रुपयांचा दंड आकारण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला आहे. जयपूरमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत राज्यातील कोरोनाचा संसर्ग जास्त असलेल्या आठ जिल्ह्यांमध्ये नाईट कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
"या" आठ जिल्ह्यांमध्ये रात्री 8 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत कर्फ्यू
जयपूर, जोधपूर, कोटा, बीकानेर, उदयपूर, अजमेर, अलवर आणि भीलवाडा या आठ जिल्ह्यांमध्ये रात्रीचा कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रात्री 8 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत हा नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. तर मास्क न घालणाऱ्यांसाठी 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्यात येत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला ९० लाखांचा टप्पा
गेल्या काही दिवसांत घसरणीला लागलेला कोरोनाचा आलेख पुन्हा डोके वर काढू लागला आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ९० लाखांचा टप्पा ओलांडला आहे. मात्र, कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही लक्षणीय आहे, ही दिलासादायक बाब. या सर्व पार्श्वभूमीवर सर्वांचे लक्ष लागले आहे कोरोना प्रतिबंधक लस आणि लसीकरण मोहिमेकडे. सरकारने लसीकरण मोहिमेसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे.
लसीचे २६० कोटी डोस मिळवण्याचे आव्हान
देशाची लोकसंख्या लक्षात घेता प्रत्येकाला पुरेशा प्रमाणात लस मिळेल यासाठी केंद्र व राज्य सरकारांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे. केंद्राने त्यानुसार समन्वय समित्यांची स्थापना करण्याचे निर्देशही दिले आहेत. एकही व्यक्ती प्रतिबंधक लसीविना राहू नये यासाठी एकूण २६० कोटी मात्रांची आवश्यकता भासणार आहे. एवढ्या मोठ्या संख्येने मात्रा उपलब्ध होणे अशक्य आहे. पुढील वर्षी जुलैपर्यंत किमान ४० ते ५० कोटी मात्रा मिळतील, या दृष्टीने सरकार प्रयत्नशील आहे. लसीचा साठ्यासाठी लागणारी शीतगृहे, कुप्या, वाहतूक इत्यादी घटकही या मोहिमेत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.