जयपूर : कोरोनाच्या संकटाकाळात राज्यसभा निवडणुकीच्या वाऱ्यांनी जोर पकडला आहे. गुजरातमध्येकाँग्रेसच्या काही आमदारांनी पक्ष सोडला असून राजस्थानमध्येही काँग्रेसचे आमदार फोडण्याचे प्रयत्न भाजपाकडून सुरु आहेत. यावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी टीका केली आहे.
निवडणुकांमध्ये अशाप्रकारे घोडेबाजार करून किती दिवस राजकारण करू शकणार आहात? जर येत्या काळात भाजपाला काँग्रेसने झटका दिला तर आश्चर्य वाटायला नको. कारण आता लोकांना सारे काही समजू लागले आहे. आजची बैठक खूप चांगली झाली. प्रत्येकजण एकीवर ठाम आहे. आम्ही पुन्हा उद्या भेटणार आहोत, असे गेहलोत म्हणाले. गुजरातनंतर आता राजस्थानमध्ये काँग्रेस संकटात आल्याने गेहलोत यांनी तातडीने आमदारांची बैठक बोलावली होती.
याचबरोबर त्यांनी भाजपाच्या घोडेबाजाराच्या राजकारणावर टीकेचे आसूड ओढले. राज्यसभेची निवडणूक सुरू आहे. खरेतर ही निवडणूक दोन महिन्यांपूर्वीच घेता आली असती. मात्र, गुजरात आणि राजस्थानमध्ये खरेदी-विक्री झाली नव्हती. यामुळे उशिर करण्यात आला. जरी ही निवडणूक आता घेण्यात येत असली तरीही तेव्हाची आणि आताची परिस्थिती सारखीच आहे, असे गेहलोत म्हणाले.
काय आहे गणित?
यावेळी गुजरातमध्ये राज्यसभेच्या ४ जागा रिक्त आहेत. गुजरात विधानसभेत भाजपाकडे १०३ आमदार आहेत. कॉंग्रेसचे ६८ आमदार आहेत, भारतीय आदिवासी पार्टीचे दोन (बीटीपी) आणि राष्ट्रवादीचे एक आमदार आहे. राज्यसभेची एक जागा जिंकण्यासाठी ३६ मते आवश्यक आहेत. आत्तापर्यंत कॉंग्रेस २ बीटीपी आमदार व एक अपक्ष अशी त्यांची संख्या ७१ मानत होती. अशा प्रकारे काँग्रेस सहजपणे २ जागा जिंकण्याचे स्वप्न पाहत होती. दुसरीकडे ३ जागांवर विजय मिळवण्यासाठी भाजपला १०६ आमदारांची गरज भासणार आहे. याचा अर्थ असा की भाजपाला तिन्ही उमेदवार जिंकण्यासाठी आणखी ३ मतांची आवश्यकता असेल. तिसरा उमेदवार म्हणून भाजपाने नरहरी अमीन यांना उमेदवारी दिली आहे.
२०१७ सारखी पुन्हा परिस्थिती
गुजरात पुन्हा एकदा २०१७ सारखी परिस्थिती दिसत आहे. २०१७ मध्ये गुजरातमध्ये भाजपाने अतिरिक्त उमेदवार उभे करुन कॉंग्रेसचे दिग्गज अहमद पटेल यांची जागा अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कॉंग्रेसच्या ६ आमदारांनी निवडणुकीच्या अगदी आधी राजीनामा दिला होता. एक मत रद्दबातल झाल्यामुळे अहमद पटेल निवडून आले होते. पण त्यासाठी कॉंग्रेसला निवडणूक आयोगापासून सर्वोच्च न्यायालयात संघर्ष करावा लागला.
अन्य महत्वाच्या बातम्या...
CoronaVirus धक्कादायक! उत्पन्नाशिवाय एक महिनाही जगू शकत नाहीत निम्मे भारतीय; सीव्होटरचा सर्व्हे
भित्रा पाकिस्तान! अफवा पसरली, 'अज्ञात विमाने हवेत उडाली'; अख्ख्या कराचीची वीज घालवली
आजचे राशीभविष्य - 11 जून 2020; वृश्चिक राशीच्या लोकांनी स्त्रियांपासून जपावे