जयपूर : अन्न-पाण्याचा त्याग करून स्वेच्छेने देहत्याग करण्याचे जैन धर्मीयांचे संथारा व्रत म्हणजे आत्महत्या असल्याचा निकाल राजस्थान उच्च न्यायालयाने सोमवारी दिला. हा निकाल राजस्थान राज्यापुरताच मर्यादित असला तरी त्याने देशभरातील जैन समाजात खळबळ उडाली असून, याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची तयारी समाजाच्या अनेक संस्थांनी लगेच सुरू केली आहे.चुरू येथील एक नागरिक निखिल सोनी यांनी केलेली रिट याचिका मंजूर करून मुख्य न्यायाधीश न्या. सुनील अंबवानी व न्या. वीरेंद्र सिंह सिरधाना यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. गेल्या एप्रिलमध्ये सुनावणी संपल्यावर राखून ठेवलेला निकाल न्यायाधीशांनी सायंकाळी ४ वाजता जाहीर केला. सविस्तर निकालपत्र लगेच उपलब्ध होऊ शकले नाही.यापुढे संथारा ही आत्महत्या मानली जावी आणि हे व्रत करणाऱ्या व्यक्तीवर भादंवि कलम ३०९ अन्वये आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आणि त्यास साथ देणाऱ्यांवर कलम ३०६ अन्वये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदला जावा, असाही आदेश न्यायालयाने दिला. विमला देवी या मरणासन्न अवस्थेत असलेल्या कर्करुग्ण महिलेस तिच्या कुटुंबीयांनी सक्तीने संथारा व्रत ठेवण्यास भाग पाडल्याच्या कथित घटनेवरून मध्यंतरी मोठा वाद निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर सोनी यांनी २००६मध्ये ही याचिका केली होती. केंद्र व राज्य सरकार या औपचारिक प्रतिवादींखेरीज जैन समाजाच्या अनेक धार्मिक व सामाजिक संघटनाही या याचिकेच्या सुनावणीत सहभागी झाल्या होत्या.कायद्याने इच्छामरणाची परवानगी नाही, सतीवर कायद्याने बंदी घालण्यात आली आहे व आत्महत्येचा प्रयत्न करणे हा गुन्हा आहे. त्याचप्रमाणे संथारा व्रताने देहत्याग करणे व्रत हासुद्धा आत्महत्येचाच निषिद्ध प्रकार आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. याउलट, ही आमची शेकडो वर्षे चालत आलेली धार्मिक प्रथा आहे व आम्हाला धर्माचरणाचा मूलभूत अधिकार असल्याने न्यायालय त्यात हस्तक्षेप करू शकत नाही, असा प्रतिवाद जैन समाजातर्फे केला गेला होता. संथारा म्हणजे आत्महत्या किंवा इच्छामरण नव्हे, तर आत्मशुद्धीची ती अंतिम साधना आहे, असेही जैन समाजाने ठासून सांगितले होते. मात्र या व्रताला प्राचीन परंपरा असली तरी ते जैन धर्मशास्त्राचे अविभाज्य अंग नाही, असे नमूद करत न्यायालयाने हा निकाल दिला.न्यायालयीन विचारभारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकास जगण्याचा मूलभूत हक्क दिलेला आहे. या हक्काचे कसोशीने रक्षण करण्याचे काम न्यायसंस्था करीत आली असली तरी जगण्याच्या हक्कात मृत्यूला कवटाळण्याचा हक्कही अंतर्भूत होतो, हे न्यायालयांनी मान्य केलेले नाही. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने १९९६मध्ये ग्यान कौर वि. पंजाब सरकार या प्रकरणात दिलेला निकाल मूलभूत मानला जातो. त्यात न्यायालयाने म्हटले की, जगण्याचा हक्क हा माणसाचा नैसर्गिक अधिकार आहे व आत्महत्येचे कृत्य अनैसर्गिक आहे... तर्कशक्ती कितीही ताणली तरी ‘जीवन संपविणे’ हे ‘जीवन जगण्यात’ कधीच अभिप्रेत असू शकत नाही. (वृत्तसंस्था)- जैन समाजात संथारा व्रत ‘सल्लेखाना वृत्त’ म्हणूनही ओळखले जाते.- आपला मृत्यू आता जवळ आला आहे, अशी खात्री झालेली व्यक्ती हे व्रत करते.- यात मोह-मायेपासून मन काढून घेण्यासोबतच अन्न-पाण्याचे सेवन पूर्णपणे बंद करून देहत्यागाने शारीरिक क्लेषांपासूनही मुक्ती मिळविली जाते.- ताज्या जनगणनेनुसार देशातील जैन धर्मीयांची लोकसंख्या ४३ लाखांच्या घरात आहे. अर्थात हा आकडा वास्तव नाही, असे समाजाचे म्हणणे आहे.- अधिकृत नोंद नसली तरी भारतात दरवर्षी सरासरी २४० व्यक्ती संथारा व्रत ठेवून देहत्याग करतात, असा अंदाज आहे.दुर्दैवी निर्णय..राजस्थान उच्च न्यायालयाने संथारा व्रतावर बंदी घालण्याचा दिलेला निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. जैन धर्माच्या सिद्धान्तांना पूर्णपणे समजावून न घेता, घेतला गेलेला निर्णय आहे, ब्रिटिशांच्या काळातही घेतला गेला नाही असा हा स्वांतत्र्योत्तर भारतातील सर्वांत ‘गुलाम’ फैसला आहे.- मुनी तरुण सागरजैन धर्म अनादी काळापासून अस्तित्वात आहे. त्याचे मान्य झालेले सिद्धान्त आहेत. त्या सिद्धान्तांनुसार संथारा व्रताचे महत्त्व आहे. ते धर्म आचरण आहे. त्याला रोखता येणार नाही. त्याला आत्महत्या आणि सती प्रथेशी जोडणे दु:खद आहे. मुनींच्या सान्निध्यात इच्छेनुसार जीवनाला पवित्र प्रवाहाशी जोडण्यासाठी संथारा व्रत एखाद्या सेतूसारखे मानले जाते.- देवेंद्र काला, महामंत्री, भारत वर्ष दिगंबर जैन तीर्थक्षेत्र समिती, महाराष्ट्र.राजस्थान हायकोर्टाने दिलेला निर्णय जैन धर्मीयांविरुद्ध असून, या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी. संथारातून होणारा मृत्यू नैसर्गिक असतो. संसारात असलेली व्यक्ती आत्म्याचा त्याग करते. त्यामुळे आत्म्याचे कल्याण होते. मोक्ष प्राप्त होतो आणि पुढील जन्म समाजाच्या उद्धारासाठी मिळतो. संसारात असलेली व्यक्तीच अन्न-पाण्याचा त्याग करते. अशांची शवयात्रा गुरू परंपरेनुसार आनंदात आणि गुलाल उधळून नेली जाते. संथाराची नोंद जैन शास्त्रांमध्ये आहे. म्हणूनच संथारा ही आत्महत्या आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. - निखिल कुसुमगर, सचिव, सकल जैन समाजयास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची गरज आहे. राज्यघटनेच्या अनुच्छेद २५ अन्वये धर्माचरणाचा मूलभूत अधिकार आहे व यात धार्मिक प्रथेचाही समावेश होतो. धर्म आणि धार्मिक प्रथा यांची फारकत करता येणार नाही. संथारा व्रत हे जैन धर्माचा अविभाज्य भाग आहे, त्यामुळे या व्रताचे पालन करणे हा जैन धर्मीयांचा घटनादत्त अधिकार आहे.- अभिषेक मनु सिंघवी, ज्येष्ठ विधिज्ञ व राज्यसभा सदस्य