ऑनलाइन लोकमत -
राजस्थान, दि. २१ - राज्यात दुष्काळ असताना आयपीएल सामने खेळवण्यावरुन राजस्थान उच्च न्यायालयाने नाराजी दर्शवली आहे. राजस्थानमध्ये पाण्याची समस्या असताना आयपीएल सामने महाराष्ट्रातून हलवून जयपूरमध्ये का खेळवले जावेत ? असा प्रश्न उच्च न्यायालयाने विचारला आहे. न्यायालयाने या प्रकरणी राज्य सरकार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) नोटीस पाठवली आहे.
राज्य सरकार आणि बीसीसीआय यांच्याव्यतिरिक्त सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग (पीएचईडी), जलसंपदा विभाग, क्रिडा व युवा विभाग आणि राजस्थान क्रिकेट असोसिएशनला नोटीस पाठवण्यात आली आहे. आयपीएल सामने जयपूरमध्ये खेळवण्याच्या निर्णयावर उच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला आहे. राज्यात दुष्काळ असताना आयपीएल सामने भरवण्यामागचं कारण काय ? अशी विचारणा राजस्थान उच्च न्यायालयाने केली आहे. राजस्थान सरकारला 27 एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. राजस्थान उच्च न्यायालयात बुधवारी आयपीएल सामने खेळवण्यावरुन जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.