शरद गुप्ता नवी दिल्ली :
जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याला संतती प्राप्तीसाठी १५ दिवसांचा पॅरोल देण्याचे आदेश राजस्थान हायकोर्टाने दिले आहेत. निर्णय देताना न्यायालयाने धार्मिक, सामाजिक व मानवीय तरतुदींचाही उल्लेख केला आहे.
न्या. संदीप मेहता आणि न्या. फरजंद अली यांनी नंदलाल यास पॅरोलवर सोडण्याचे आदेश दिले. ऋग्वेदातील ऋचा याशिवाय यहुदी, ख्रिश्चन आणि इस्लामिक धार्मिक ग्रंथ व प्रथांचा आधार घेत, हा निर्णय देण्यात आला आहे.
न्यायालयाने स्पष्ट केले की, हिंदू धर्मानुसार मानवी जीवनाचे चार लक्ष्य असतात. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. यातील काम या लक्ष्याशिवाय अन्य पुरुष एकटाच प्राप्त करू शकतो. एका स्त्रीसाठी मातृत्व हे जीवनातील सर्वात मोठे लक्ष्य असते. नंदलालच्या चुकीसाठी त्याची पत्नी रेखा यांना मातृत्वाच्या सुखापासून वंचित ठेवले जाऊ शकत नाही.
न्यायालयाने काय दिला आदेशन्या. फरजंद अली यांच्याकडून देण्यात आलेल्या निर्णयात म्हटले आहे की, राजस्थान सरकारच्या पॅरोल नियम २०२१ मध्ये संतती प्राप्तीसाठी पॅरोल दिला जाण्याची तरतूद नाही. मात्र, धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि मानवीय दृष्टिकोनातून न्यायालय आपल्या अधिकारांचा उपयोग करून नंदलाल यास १५ दिवसांच्या पॅरोलवर सोडण्याचा आदेश देते.