जयपूर:राजस्थानची राजधानी जयपूरमधील सरकारी रुग्णालयातून निष्काळजीपणाची एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवार संध्याकाळी सांगणेरी गेट परिसरातील महिला रुग्णालयाच्या गेट क्रमांक 1 बाहेर एक कुत्रा त्याच्या जबड्यात मृत अर्भक घेऊन फिरताना दिसला. कुत्र्याला पाहताच लोकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्याने अर्भक सोडून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच रुग्णालय व्यवस्थापनाने पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत.
रविवारी दुपारी हॉस्पिटलच्या आवारातील पार्किंगजवळ एक कुत्रा तोंडात मांसाचा तुकडा घेऊन फिरताना दिसलाय त्यानंतर हॉस्पिटलच्या हाऊसकीपिंग कर्मचाऱ्यांनी नीट पाहिले असता, कुत्र्याच्या तोंडात अर्भक असल्याचे त्यांच्या लक्षात आले. कुत्र्याच्या तोंडात नवजात अर्भक पाहिल्यानंतर रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला वाचवले आणि तपासणीत त्याला मृत घोषित करण्यात आले. हे अर्भक आठ महिन्यांच्या मुलाचे असल्याचे समोर आले. महिला रुग्णालयाचे हाउसकीपिंग पर्यवेक्षक सोहनलाल यांच्या वतीने लाल कोठी पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी सोमवारी रुग्णालयाच्या आजूबाजूला लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्याचबरोबर रुग्णालय प्रशासनही या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करत आहे. महिला रुग्णालयाच्या अधीक्षक आशा वर्मा सांगतात की, कुत्रा रुग्णालयाच्या बाहेरून नवजात अर्भकाला घेऊन आला होता आणि रुग्णालयाच्या बाहेर पार्किंगच्या दिशेने फिरत होता. पोलीस सध्या मृत बालकाच्या कुटुंबीयांचा शोध घेत असून, प्राथमिक तपासात हा अर्भक रुग्णालयातच मृत जन्माला आला असावा, असा अंदाज आहे. कुटुंबीयांनी मृत अर्भकाला जवळच कुठेतरी जमिनीत पुरले असावे आणि नंतर कुत्र्याने ते खोदून परत आणल्याचा अंदाज आहे.