जोधपूर येथे लाउडस्पीकरच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वाद अद्यापही थांबल्याचे दिसत नाही. आता येथे पुन्हा एकदा दोन गट समोरासमोर आले आहेत. ईदच्या नमाजदरम्यान हा वाद पेटल्याचे बोलले जात आहे. यावेळी पोलिसांना येथे पुन्हा एकदा लाठीचार्ज करावा लागला आणि आश्रूधुराचे गोळेही सोडावे लागले. याशिवाय, मंगळवारी अनंतनाग येथेही मशिदीबाहेर दगडफेक झाली. ईदच्या नमाजनंतर, आंदोलकांनी संरक्षण दलाच्या जवानांवर दगडफेक केली. मध्य प्रदेशातील खरगोन येथेही दंगलीच्या 22 दिवसांनंतर, कर्फ्यूमध्येच सन साजरा केला जात आहे. येथे तब्बल 1300 पोलीस कर्मच्याऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
डझनावर वाहनांचे नुकसान -सांगण्यात येते, की येथे पुन्हा एकदा पोलिसांनी फ्लॅग मार्च सुरू केला. मिळालेल्या माहितीनुसार, आज ईदच्या नमाज वेळी येथे मोठी गर्दी होती. याच वेळी वाद पेटला. धुडगूस घालणाऱ्या लोकांनी जवळपास डझनावर वाहनांचे नुकसान केले आहे. या वाहनांच्या काचा फुटल्या आहेत. याशिवाय पोलिसांच्याही चार वाहनांचे नुकसान झाले आहे. सध्या येथील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत आहे. यातच केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, भाजप आमदार सूर्यकांता व्यास यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी येथे ठिय्या दिला आहे.
यापूर्वी, सोमवारी रात्री उशिरा जोधपूर येथील जालोरी गेट चौकात दोन्ही गटात लाऊडस्पीकर आणि झेंडे हटविण्याच्या मुद्द्यावरून दगडफेक झाली होती. आताही त्याच ठिकाणी पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. वृत्तानुसार, येथे एका समुदायातील लोकांनी, जालोरी भागातील, स्वातंत्र्यसैनिक बाल मुकुंद बिस्सा यांच्या पुतळ्यावरील झेंड्यावर आक्षेप घेतला. तसेच हा झेंडा आणि ईदनिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरविरोधात घोषणाबाजी केली.
याच बरोबर या आंदोलकांनी हा झेंडा आणि बॅनर काढून टाकले. यामुळे वाद वाढला. यानंतर दुसऱ्या समाजाचे लोक नाराज झाले आणि नंतर दोन्ही गटांत दगडफेक सुरू झाली. यानंतर, जोधपूरचे जिल्हाधिकारी हिमांशू गुप्ता यांनी शहरातील इंटरनेट सेवा मंगळवारी एक वाजल्यापासून अनिश्चित काळासाठी बंद करण्याचे आदेश दिले आहेत.