भारतीय जनता पक्षाने स्थापनेवेळी जनतेला जी आश्वासने दिली होती, ती सर्व आश्वासने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केली आहेत. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी जम्मू काश्मीरमध्ये आर्टिकल 370 लागू करून जी सर्वात मोठी चूक केली होती. ती चूक केंद्रातील मोदी सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी संपुष्टात आणली आणि जम्मू काश्मीरात तिरंगा फडकला, असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. ते राजस्थानातील जयपूरमध्ये बोलत होते.
शाह म्हणाले, ''भाजप हा एक असा पक्ष आहे, जो नेत्याच्या बळावर नाही, तर बूथवरील आपल्या कार्यकर्त्यांच्या बळावर निवडणुका जिंकतो. नरेंद्र मोदी यांनी जगात भारताचा डंका वाजविण्याचे काम केले आहे. यामुळे संपूर्ण देशातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा निवडून पंतप्रधान बनविण्यासाठी तयार आहे.''
सोनिया गांधी आणि मनमोहन सिंगांवरही केलं भाष्य -काँग्रेसला निशाण्यावर घेत अमित शाह म्हणाले, गेल्या दहा वर्षांपूर्वी देशात यूपीए सरकार होते. सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांनी देशाचे भविष्य अंधकारमय केले होते. 2014 मध्ये देशातील आणि राजस्थानच्या जनतेने नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवण्याचे काम केले आणि 10 वर्षात पंतप्रधान मोदींनी देशातील प्रत्येक क्षेत्रात बदल घडवून आणला.
काय म्हणाले अमित शाह? - अमित शाह म्हणाले, 2014 मध्ये 55% मतदानासह 25 च्या 25 जागाही राजस्थानातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिल्या होत्या. त्यानंतर, 2019 मध्ये मतांची टक्केवारी वाढून 61% झाली. पुन्हा सर्वच्या सर्व 25 जागा भाजपला मिळाल्या. आता पुन्हा नरेंद्र मोदी आले आहेत. यावेळी 70% मतांसह 25 च्या 25 ही जागा जिंकून हॅट्रिक लगणार आहे.