मागच्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये राजस्थानमध्ये काँग्रेसला खातेही उघडता आलं नव्हते. मात्र यावेळी राजस्थानमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी काँग्रेसकडून मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. पण काही मतदारसंघामध्ये अंतर्गत घडामोडींमुळे काँग्रेससमोरील अडचणी वाढल्या आहेत. असाच एक मतदारसंघ आहे बांसवाडा. आदिवासीबहूल असलेल्या या मतदारसंघामध्ये आपल्याच उमेदवाराविरोधात प्रचार करण्याची वेळ काँग्रेसवर आली आहे. येथे नव्याने उदयास आलेल्या भारत आदिवासी पार्टी (BAP) सोबत काँग्रेसने आघाडी केली असून, या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार काँग्रेसकडून करण्यात येत आहे. काँग्रेसमधील अंतर्गत विरोध तसेच केंद्र आणि राज्यातील पक्षसंघटनेमध्ये असलेल्या अभावामुळे ही परिस्थिती ओढवली आहे.
बांसवाडा मतदारसंघात काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अरविंद डामोर रिंगणात आहेत. तसेच पक्ष मात्र त्यांच्याविरोधात प्रचार करत आहेत. बांसवाडा लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या बागीदौरा विधानसभा मतदारसंघातही अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. येथे काँग्रेसचे कार्यकर्ते पक्षाचे अधिकृत उमेदवार कपूर सिंह यांच्याविरोधात BAP चे उमेदवार जयकृष्ण पटेल यांच्याविरोधात प्रचार करत आहेत. येथे जयकृष्ण पटेल हे BAP चे उमेदवार आहेत. दोन्ही मतदारसंघात २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
२०२३ च्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेसने आदिवासीबहूल भागात तीन जागा जिंकणाऱ्या भारत आदिवासी पार्टीसोबत आघाडीसाठी चर्चा सुरू केली. मात्र BAP पक्षाने बांसवाडा, उदयपूर आणि चित्तौडगड या मतदारसंघावर दावा केला. त्यामुळे जागावाटप अडले होते. माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत, प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंह डोटासरा, सचिन पायलट आणि इतर स्थानिक नेते BAPसोबतच्या आघाडीबाबत चिंतीत होते. हा पक्ष खूप महत्त्वाकांक्षी आहे, असं त्यांचं म्हणणं होतं.
बांसवाडा लोकसभा मतदारसंघातून माजी कॅबिनेट मंत्री महेंद्रसिंह मालवीय यांना उमेदवारी देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला होता. मात्र ते भाजपामध्ये गेल्याने काँग्रेसवर नवा उमेदवार शोधण्याची वेळ आली. यादरम्यान काँग्रेस आणि BAP यांच्यांत आघाडीबाबत चर्चा सुरू होती. मात्र समन्वयाच्या अभावामुळे येथे दोन्ही पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले. तसेच उमेदवारी अर्जही भरले गेले. त्यात काँग्रेसकडून अरविंद डामोर तर BAPकडून राजकुमार रोत यांना उमेदवारी दिली गेली. मात्र रौत यांच्याबाजूने मोठ्या प्रमाणात समर्थन असल्याचे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या लक्षात आले. त्यानंतर भाजपामध्ये गेलेल्या आपल्या माजी नेत्याला धडा शिकवण्यासाठी काँग्रेसने आपल्या अधिकृत उमेदवाराऐवजी राजकुमार रोत यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. तसेच काँग्रेसचे अधिकृत उमेदवार माघार घेतील, असे जाहीर करण्यात आले. मात्र अशी घोषणा झाल्यानंतर काँग्रेसचे बांसवाडामधील उमेदवार अरविंद डामोर भूमिगत झाले. तसेच उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतरच समोर आले. त्यामुळे आता या मतदारसंघात आपल्या अधिकृत उमेदवाराविरोधातच प्रचार करण्याची वेळ काँग्रेसवर आली आहे.