मुंबई: जगाच्या कानाकोपऱ्यातून हजारो किलोमीटरचा रस्ता कापून येणाऱ्या सर्जनशील कलावंतांना तसेच कलेची उत्तम जाण असणाऱ्या रसिकांना एकाच व्यासपीठावर एकत्र येता यावे आणि कलेची देवाण-घेवाण व्हावी, या हेतून सुरू झालेला ‘राग’स्थान’ महोत्सव यंदा थारच्या वाळवंटात रंगणार आहे. २३ ते २५ फेब्रुवारीदरम्यान राजस्थानच्या जैसलमेर येथे आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात ४० हून अधिक देशांतील हजारो कलावंत सहभागी होणार आहेत.अत्युत्तम आणि दर्जेदार संगीताचा सर्वोत्तम अनुभव रसिकांपर्यंत पोहोचवावा हा महोत्सवाचा मुख्य हेतू आहे. यंदा महोत्सवात कलावंतांना आपली कला सादर करता यावी, यासाठी मोरियो (मोर), बिराखा (पाऊस) आणि अम्मारा (तारा) असे तीन भव्य व्यासपीठ उभारण्यात येणार आहेत. याशिवाय ४०हून अधिक लाइव्ह कला प्रकार सादर केले जाणार आहेत. मुंबई, दिल्ली, पुणे, अहमदाबाद अशा शहरांतून सहभागी होणाऱ्या रसिकांची सशुल्क प्रवासाची सोय करण्यात येणार आहे. यासाठी महोत्सवापूर्वी ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे.विशेष म्हणजे जगभरातून येणाऱ्या हजारो कलावंतांची राहण्याची सोय थारच्या वाळवंटातच केली जाणार आहे. यासाठी तीन आकाराचे तंबू उभारण्यात येणार आहेत. अत्याधुनिक सेवा सुविधांनी परिपूर्ण असलेल्या या तंबूसाठी शुल्क आकारण्यात येणार आहे. सुर्याद्यपासून सुरू होणाऱ्या या महोत्सवात सुर्यास्थानंतरही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे जगातील सर्वोत्तम चित्रपट रसिकांना मोकळ्या आकाशालाखाली पाहता येणार आहेत.याशिवाय वाळूच्या ढिगाऱ्यावरून रोलिंग डाऊन, ४० फुट उंचीचा सी-सॉ, विविध कार्यशाळा आणि नक्षत्रदर्शनची सफर असा भरगच्च कार्यक्रम रसिकांना आनंद लुटता येणार आहे. या महोत्सवादरम्यान हार्ले डेव्हिडसनवरून बाईक राइड करता येणार आहे. वाळवंटात कुठेही अस्वच्छता होऊ नये यासाठी प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळण्यात येणार आहे. तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांमुळे स्थानिक जीवन विस्कळित होऊ नये म्हणून आयोजकांकडून एकूण ८७ हजार लीटर पाणी आणि ५ हजार लीटर चहाची व्यवस्था करण्यात येणार आहे.वाळवंटात राहणाऱ्या लोकांचे आयुष्य अतिशय प्रेरणादायी आहे. प्रचंड कष्ट आणि डोक्यावर तळपणारा सुर्य यामुळे लोकांचा कस पणाला लागतो. यात त्यात इथल्या लोकांचे मनोधैर्य उंचावते, याकरताच इथे महोत्सव आयोजित केला असल्याचे आयोजकांनी सांगितले.
‘थार’च्या वाळवंटात रंगणार ‘राग’स्थान’ महोत्सव!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2018 2:23 PM