एकीकडे राजस्थानमधील लोक नववर्षाचे जल्लोषात स्वागत करत होते, तर दुसरीकडे याच राजस्थानमध्ये नवर्षाच्या पहिल्याच दिवशी एका कुटुंबावर काळाने घाला घातला. एका भीषण रस्ते अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला, यातील 9 जण एकाच गावातील, तर 8 जण एकाच कुटुंबातील होते. जयपूरच्या सामोदमधील 9 जण नववर्षाच्या पहिल्या दिवशी कुलदेवीचे दर्शन घेऊन परतत होते. यावेळी झालेल्या भीषण अपघातात 2 सख्ख्या भावांसह पत्नी आणि मुलांचा मृत्यू झाला.
एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यूकैलाशचंद आणि सुवालाल यांचे कुटुंब 1 जानेवारी रोजी कुलदेवी मातेचे दर्शन घेऊन त्यांच्या नवीन वाहनाने घरी परतत असताना खंडेला-पलसाणा रस्त्यावर त्यांच्या आधी दुचाकीला आणि नंतर ट्रकला धडक दिली. या भीषण अपघातात ज्या 12 लोकांचा मृत्यू झाला, यातील 9 जण एकाच गावातील होते. हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट म्हणजे, यातील एकाच कुटुंबातील 8 जणांचा तिरडी एकाचवेळी उठली. घरातील चार वर्षीय चिमुकल्याने या आठ जणांना एकाच वेळी मुखाग्नी दिला. हे दृष्य पाहून तिथे उपस्थित सर्वांनाच अश्रू अनावर झाले होते.
एकाच चितेवर 8 मृतदेह या अपघातात कैलाशचंद यांची दोन मुले विजय व अजय यांच्यासह मुलगी रेखा, विजयची पत्नी राधा, सुवालाल यांच्या दोन सूना पूनम व अनुराधा, नातू आरव व नात निक्कू, शेजारी अरविंद यांचा मृत्यू झाला. या भीषण अपघातानंतर सोमवारी सर्व मृतदेह एकत्र गावात आल्यावर गावात एकच खळबळ उडाली. घराच्या अंगणात ठेवलेले मृतदेह पाहून गावात नीरव शांतता पसरली. यावेळी 8 तिरड्या एकत्र उचलल्या आणि सर्वांना एकाच चितेवर जाळण्यात आले. अंत्ययात्रेत गावातील शेकडो लोक सामील झाले होते. यावेळी प्रत्येकाच्या ओठावर एकच शब्द होता... हे राम!