जयपूर: आयटी क्षेत्रात राजस्थान अभूतपूर्व प्रगती करत असल्याचे राज्याच्या मुख्य सचिव उषा शर्मा यांनी स्पष्ट केले. राजीव गांधी सेंटर फॉर ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमास माहिती व तंत्रज्ञान विभागाचे आयुक्त व आरकॅटचे एमडी आशिष गुप्ता यांची उपस्थिती होती. यावेळी आरकॅट आणि वनस्थली विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार झाला. त्यानुसार, आरकॅट विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना प्रगत तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणार आहे.
मुख्य सचिव उषा शर्मा म्हणाल्या की, महिलांनी त्यांची शक्ती आणि महत्त्व जाणले पाहिजे. शिक्षण, आरोग्य, सुरक्षा, आयटी आदी क्षेत्रांत राज्याने मोठी प्रगती केली आहे. भविष्यातील ३०-४० वर्षांचा विचार करून राज्य सरकार काम करत आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागाचे आयुक्त व आरकॅटचे एमडी आशिष गुप्ता म्हणाले की, ही भारतातील एकमेव संस्था आहे, जी विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य क्षमता निर्माण करून त्यांना रोजगार मिळवून देते. आरकॅटच्या कार्यकारी संचालिका ज्योती लुहाडिया म्हणाल्या की, महिलांचा तंत्रज्ञानातील सहभाग वाढविण्यासाठी त्यांना योग्य संधी दिली पाहिजे. कार्यक्रमास प्रा. इना शास्त्री, डॉ. जयश्री पेरीवाल, अर्चना सुराणा, अलका बत्रा, अंजू सिंग आणि नीलम मित्तल यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"