अशोक गहलोत यांनी सोनिया गांधींकडे केली सचिन पायलट यांची तक्रार! कागदपत्रातून आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 09:22 PM2022-09-30T21:22:56+5:302022-09-30T23:50:47+5:30
Ashok Gehlot : अशोक गेहलोत यांनी हाताने लिहिलेला एक कागद घेतला होता, त्यात माफीनाम्यासोबत सचिन पायलट यांच्याविरोधात आरोप होते.
नवी दिल्ली : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) यांनी गुरुवारी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांची भेट घेतली. या भेटीनंतर जयपूरमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होऊ न शकणे आणि संबंधित घटनाक्रमावर आपण सोनिया गांधी यांची माफी मागितल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
दरम्यान, सोनिया गांधी यांना त्यांच्या निवासस्थानी भेटण्यासाठी जाताना अशोक गहलोत यांना मीडियाच्या कॅमेऱ्यांचा सामना करावा लागला. यावेळी अशोक गेहलोत यांच्या हातात एक कागद होता, ज्यामध्ये सचिन पायलट यांच्या गटातील गुंडगिरी, भाजपशी हातमिळवणीपासून पक्ष सोडण्यापर्यंतच्या अनेक गोष्टी लिहिल्या होत्या. अशोक गेहलोत यांनी हाताने लिहिलेला एक कागद घेतला होता, त्यात माफीनाम्यासोबत सचिन पायलट यांच्याविरोधात आरोप होते.
कागदावर सचिन पायलट पक्ष सोडणार, असे लिहिले होते. तसेच '102 विरुद्ध 18' असेही लिहिले होते. म्हणजेच अशोक गेहलोत यांना 102 आमदारांचा पाठिंबा आहे, तर सचिन पायलट यांच्याकडे केवळ 18 आमदार आहेत, जे त्यांना पाठिंबा देत आहेत. तसेच, कागदावर लिहिले होते, जे झाले ते खूप दुःखद आहे, मी पण खूप दुखी आहे. विशेष म्हणजे, या कागदामध्ये सचिन पायलट गटावर आरोपांची मालिका होती. मात्र, यातील निम्मेच पॉइंट कॅमेऱ्यात दिसू शकले कारण बाकीचे अशोक गहलोत यांच्या हाताने झाकले गेले होते.
पुष्करमधील घटनेचाही उल्लेख
कागदावर असेही लिहिले होते की, आमचे 102 आमदार आहेत, तर सचिन पायलट यांचे फक्त 18 आहेत. भाजपने आमदारांना 10-50 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. पहिले प्रदेशाध्यक्ष, ज्यांनी पदावर असताना बंड केले, असे अशोक गेहलोत यांनी लिहिले होते. तसेच, आरोपांमध्ये पुष्कर घटनेचाही उल्लेख आहे. पुष्करमध्ये राज्यमंत्री अशोक चंदना यांच्यावर बूट फेकण्यात आले, तर सचिन पायलट यांच्या बाजूने घोषणाबाजी करण्यात आली.
अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार नकार
विशेष म्हणजे, गुरुवारी अशोक गेहलोत यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले. 'गेल्या 50 वर्षांत मी काँग्रेस पक्षात निष्ठावान सैनिक म्हणून काम केले. हायकमांडने माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवून जबाबदारी दिली', असे अशोक गहलोत यांनी सांगितले. तसेच, आज त्यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांना काँग्रेस अध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून नामांकित केले.