जयपूर: राजस्थानमध्ये बंडखोरी करणारे सचिन पायलट यांच्यावर काँग्रेसने हकालपट्टीची कारवाई केली आहे. त्यांना उपमुख्यमंत्रिपद आणि प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवलं आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याविरोधात सचिन पायलट यांनी नाराजीचं बंड पुकारलं, त्यानंतर काँग्रेसने भाजपावर आरोप करत सरकार अस्थिर करण्यासाठी पडद्यामागून हालचाली करत असल्याचा आरोप केला आहे. मात्र अजूनही काँग्रेसकडून सचिन पायलट यांना स्वगृही परतण्याचे निमंत्रण देण्यात येत आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सचिन पायलट व त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना परत येण्याचं आवाहन केलं आहे. रणदीप सुरजेवाला म्हणाले की, आमचे युवा सहकारी सचिन पायलट व इतर आमदारांना काँग्रेसनं आग्रह केला आणि विचारलं की, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासोबत काही मतभेद असतील तर पक्षासमोर मांडावं. काँग्रेस पक्ष तुमच्या तक्रारी ऐकण्यासाठी तयार आहे. अनेक वेळा त्यांना पक्षानं परत येण्याची विनंती केली, रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे.
पाच दिवसांपासून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी त्यांच्या परतीचे दरवाजे खुले ठेवले. काँग्रेस नेतृत्त्वानं एकापेक्षा अधिक वेळा संपर्क केला. त्याचबरोबर समिती सदस्यांनीही त्यांना विनंती केली होती. त्यांना त्यांची भूमिका मांडण्याची विनंती केली, असं रणदीप सुरजेवाला यांनी स्पष्ट केलं आहे.
सचिन पायलट यांना भाजपात जायचं नसेल आणि त्यांना काँग्रेसमध्ये परत यायचं असेल, तर त्यांनी हरयाणातील भाजपा सरकारकडून केलं जाणारं आदरातिथ्य सोडून तातडीनं जयपूरला परतावं, असं रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले.
तसेच सचिन पायलट यांनी आपली निष्ठा काँग्रेससोबत असल्याचं जाहीर करायला हवं होतं. मात्र सचिन पायलट यांनी असं काहीच न केल्यामुळेच आम्हाला जड अंतकरणानं त्यांच्यावर कारवाई करावी लागली, असं रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले.