राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पायलट यांनी बंडाचा झेंडा रोवल्याने सध्या राज्यातील अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकार संकटात आले आहे. सचिन पायलट हे काँग्रेसचा हात सोडून समर्थक आमदारांसह भाजपामध्ये डेरेदाखल होणार असल्याच्या चर्चांना उत आला आहे. मात्र काही वेळेपूर्वी सचिन पायलट यांनी पुकारले बंड अखेर थंड झाल्याची चिन्ह दिसून येत आहे.
अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वादावर काँग्रेसच्या कार्यकरिणीची बैठक झाली. यामध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी दोन्ही नेत्यांशी संवाद साधला. तसेच रणदीप सुरजेवाला यांनी दिलेल्या माहितीनूसार, सचिन पायलट यांच्या सकाळपासून राहुल गांधी संपर्कात होते. तसेच राहुल गांधी यांनी अशोक गहलोत यांच्यासोबतही फोनवरुन चर्चा केली.
राहुल गांधी यांनी सचिन पायलट यांना कोणताही मोठा निर्णय घेऊ नये, असा निरोप धाडला होता. सचिन पायलट यांनी परत यावे, त्यांना सन्मानाने पक्षात स्थान दिले जाईल,असं राहुल गांधींनी सांगितल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आता सचिन पायलट कोणती भूमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
अशोक गेहलोत यांनी काँग्रेस आमदारांच्या बैठकीपूर्वी कॅमेऱ्यासमोर शक्ती प्रदर्शन केले. एवढेच नाही, तर या बैठकीसाठी १०२ आमदार उपस्थित असल्याचा दावाही करण्यात येत आहे. यावेळी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर व्हिक्ट्री साइनदेखील केल्याचे दिसून आले होते.
दरम्यान, सचिन पायलट यांना काँग्रेसच्या ३० आमदारांचे समर्थन मिळाले, जर त्यांना या आमदारांची साथ मिळाली आणि त्यांनी तिसरी आघाडी बनवली तर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या सरकारचं नुकसान होऊ शकतं. पण तिसरा गट बनवण्यासाठी त्यांना काँग्रेस पक्षाच्या एक तितृयांश आमदारांचे पाठबळ लागणार आहे. सध्याच्या परिस्थितीत सचिन पायलट यांना ३५-४० आमदारांचे समर्थन लागेल जे आव्हानात्मक असणार आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या-