पायलट अकार्यक्षम, बिनकामाचे; गेहलोत यांच्या टीकेला बंडखोर नेत्याचं प्रत्युत्तर; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 07:30 PM2020-07-20T19:30:22+5:302020-07-20T19:34:05+5:30
Rajasthan Political Crisis: गेहलोत यांनी माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली होती
जयपूर: राजस्थानात मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांच्यामधील संघर्ष सुरूच आहे. गेहलोत सातत्यानं पायलट यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. या टीकेला पायलट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पायलट अकार्यक्षम आणि बिनकामाचे असल्याची टीका गेहलोत यांनी केली होती. या टीकेला पायलट यांनी उत्तर दिलं आहे. माझ्यावर करण्यात आलेले आरोप तथ्यहीन आहेत. या आरोपांमुळे मला दु:ख झालं आहे. पण त्यामुळे मला धक्का बसलेला नाही, असं पायलट म्हणाले.
माझी प्रतिमा मलीन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच प्रयत्नांना भाग म्हणून माझ्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. यापुढेही असे आरोप होत राहतील. मात्र मी आत्मविश्वास किंचितही ढळू देणार नाही, असं पायलट यांनी म्हटलं. आपल्यावर करण्यात आलेले सर्व आरोप निराधार असल्याचं पायलट म्हणाले.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पायलट यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली. 'सचिन पायलट यांना कमी वयातच खूप काही मिळाले होते. मात्र मात्र त्यांनी पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले. ते अकार्यक्षम आहेत, हे मला आधीपासून माहीत होतं,' अशी बोचरी टीका गेहलोत यांनी केली.
राजस्थानमधील सत्तासंघर्षात पायलट यांच्यावर आघाडी घेतल्यानंतर आता अशोक गहलोत हे त्यांच्याविरोधात आक्रमक होऊ लागले आहेत. गेहलोत म्हणाले की, आम्ही सचिन पायलट यांच्याबाबत कधीही प्रश्न उपस्थित केले नाहीत. राजस्थान हे असं राज्य असावं जिथे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना बदलण्याची मागणी झाली नाही. ते बिनकामाचे आहेत, अकार्यक्षम आहेत, हे आम्हाला माहीत होतं. मात्र आम्ही त्यांच्याविरोधात कधी काही बोललो नाही. आम्ही सर्वांनी त्यांना सन्मान दिला.
गेहलोत पुढे म्हणाले की, आता हा जो काही खेळ झाला आहे तो १० मार्चलाच होणार होता. मात्र तेव्हा आम्ही हा प्रकार सर्वांसमोर आणला. सचिन पायलट यांची काँग्रेसचा अध्यक्ष बनण्याची महत्त्वाकांक्षा होती. मोठमोठे कॉर्पोरेट त्यांना फंडिंग करत आहेत. तसेच भाजपाकडूनही फंडिंग केली जात आहे. मात्र आम्ही या सर्व कारस्थानाची पोलखोल केली.
सचिन पायलट बिनकामाचे, अकार्यक्षम आणि दगाबाज! अशोक गहलोत यांची शेलक्या शब्दांत टीका