मुंबई: राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पायलट यांनी बंडाचा झेंडा रोवल्याने सध्या राज्यातील अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकार संकटात आले आहे. सचिन पायलट हे काँग्रेसचा हात सोडून समर्थक आमदारांसह भाजपामध्ये डेरेदाखल होणार असल्याच्या चर्चांना उत आला आहे. (Rajasthan Political Crisis)
राजस्थानमधील काँग्रेसचं सरकार धोक्यात आहे. याचदरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या महाराष्ट्रातील विश्वासू चेहरा म्हणून ओळख असलेले खासदार राजीव सातव यांनी राजस्थानला रवाना होण्याचे आदेश दिले आहे. राहुल गांधी यांनी राजीव सातव यांना निरोप पाठवला असून, ते आज संध्याकाळीच राजस्थानला रवाना होणार आहेत, अशी माहिती समोर येत आहे. याआधी देखील राजीव सातव यांनी गुजरातमध्ये पक्षबांधणीत मोठं काम केलं होतं. त्याचंच फळ म्हणून काँग्रेसने त्यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला होता.
तत्पूर्वी, सचिन पायलट यांना मनवण्यासाठी काँग्रेसकडून ऑफर देण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, सचिन पायलट आणि अन्या आमदारांसाठी काँग्रेसचे दरवाजे नेहमी खुले आहेत. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासोबत सचिन पायलट यांची चर्चा होऊ शकते. त्यामुळे सचिन पायलट यांनी फोन करुन ते बैठकीत कधीपर्यत सहभागी होऊ शकतात हे सांगाव, असं रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले.
तसेच राजस्थान वैयक्तिक स्पर्धेपेक्षा मोठा असल्याचे रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले. त्यामुळे सचिन पायलट यांची सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासोबत पुढे चर्चा होते की नाही, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, सचिन पायलट यांना काँग्रेसच्या ३० आमदारांचे समर्थन मिळाले, जर त्यांना या आमदारांची साथ मिळाली आणि त्यांनी तिसरी आघाडी बनवली तर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या सरकारचं नुकसान होऊ शकतं. पण तिसरा गट बनवण्यासाठी त्यांना काँग्रेस पक्षाच्या एक तितृयांश आमदारांचे पाठबळ लागणार आहे. सध्याच्या परिस्थितीत सचिन पायलट यांना ३५-४० आमदारांचे समर्थन लागेल जे आव्हानात्मक असणार आहे.