नवी दिल्ली - राजस्थानमध्ये सत्तासंघर्ष पाहायला मिळत आहे. पक्षाविरोधात बंडाचा झेंडा हाती घेतलेल्या सचिन पायलट (Sachin Pilot) यांना माघारी बोलवण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेसने पायलट यांची उपमुख्यमंत्रिपदासह प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली. या कारवाईनंतरही पायलट यांनी आपण भाजपामध्ये जाणार नसल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे काँग्रेसने त्यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. याच दरम्यान आपने काँग्रेसवर निशाणा साधत टोला लगावला आहे. (Rajasthan Political Crisis)
काँग्रेस व्हेंटिलेटरवर असून प्लाझ्मा, रेमडेसिवीरही किंवा इतर कोणतंही औषध त्यांना वाचवू शकत नाही असं म्हटलं आहे. आपचे प्रवक्ता राघव चड्ढा यांनी काँग्रेस सध्या व्हेंटिलेटरवर असून कोरोना संकटावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज असताना घाणेरडं राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच आम आदमी पक्ष लोकांसमोर पर्याय म्हणून उभं राहण्याचा प्रयत्न करत असल्याचं देखील म्हटलं आहे. काँग्रेसचं भवितव्य अंधारात आहे. पक्ष आणि देशालाही ते उज्ज्वल भविष्य देऊ शकत नाहीत. नवीन पिढीला त्यांनी पुढे येऊन पर्याय म्हणून संधी दिली पाहिजे असं चड्ढा यांनी म्हटलं आहे.
"आज देशावर कोरोनाचं संकट आहे. संपूर्ण देश राजकीय पक्ष एकत्र काम करतील अशी अपेक्षा करत असताना येथे एक राजकीय पक्ष आमदार विकत असून दुसरा पक्ष त्यांना खरेदी करत आहे. देश राजस्थानमधील राजकीय नाट्य पाहत आहे. हे घाणेरडं राजकारण पाहून देशातील जनता दुखावली आहे. संकटाच्या परिस्थितीत राजकीय पक्षांचं घाणेरडं राजकारण पाहणं वेदनादायी आहे. काँग्रेसचं कोणतंही भविष्य नसून देशालाही चांगलं भविष्य देऊ शकत नाहीत हे स्पष्ट झालं आहे" असं राघव चड्ढा यांनी म्हटलं आहे.
राघव चड्ढा यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. "काँग्रेस व्हेंटिलेटरवर असून प्लाझ्मा किंवा रेमडेसिवीरही त्यांना वाचवू शकत नाही. लोकांना आता आम आदमी पक्षाकडूनच अपेक्षा आहेत. आपची देशभरात संघटनात्मक ताकद मोठी नाही याची आम्हाला कल्पना आहे. मात्र आता देशातील लोकांसाठी हा एकमेव पर्याय असल्याची खात्री झाली आहे" असं देखील चड्ढा यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : 'प्लाझ्मा दान करा आणि 5000 मिळवा'; 'या' सरकारने घेतला मोठा निर्णय
CoronaVirus News : बापरे! कोरोनाग्रस्ताला आली पान मसाल्याची तलफ, रुग्णालयातून काढला पळ अन्...
चीनने 59 अॅप्सच्या बंदीवर पुन्हा एकदा विचारला प्रश्न, भारताने दिलं 'हे' सडेतोड उत्तर