आदेश रावलनवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष व राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाबाबत काँग्रेसमध्ये पेच कायम आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावतीने अंबिका सोनी व आनंद शर्मा हे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी चर्चा करीत आहेत. काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांचे समकक्ष असून, ते गेहलोत यांच्या पाठीशी उभे आहेत.
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावतीने मध्यस्थी करणारे अंबिका सोनी व आनंद शर्मा यांनी अशोक गेहलोत यांना स्पष्ट केले आहे की, कोणत्याही अटीवर चर्चा होऊ शकत नाही. गेहलोत यांनी आधी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, त्यानंतरच चर्चा होऊ शकेल, असे सोनिया गांधी यांचे मत आहे.
३० सप्टेंबर रोजी काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे. सोनिया गांधी व अशोक गेहलोत यांच्यात समझोता व्हावा व गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करावा, असे पक्षाच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांना वाटते. परंतु गेहलोत आधीच्या फॉर्म्युल्यावर राजी झाले तरच हे शक्य आहे, असे पक्षश्रेष्ठींनी स्पष्ट केलेले आहे. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करावा व सचिन पायलट यांना राजस्थानचा मुख्यमंत्री करावे. अशोक गेहलोत आज दिल्लीत दाखल होत असले तरी त्यांची सोनिया गांधी यांना भेटण्याची वेळ निश्चित झालेली नाही.
अध्यक्षपदासाठी दिग्विजय सिंह यांचा उमेदवारी अर्ज?
- राजस्थानातील राजकीय नाट्यानंतर काँग्रेस अध्यक्षपदासाठी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे अध्यक्षपदासाठी आता ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह हे उमेदवारी अर्ज दाखल
- करू शकतात.
- पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, दिग्विजय सिंह हे बुधवारी रात्री दिल्लीत दाखल होतील. गुरुवारी ते काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे.
- अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर आहे; तर, अर्ज परत घेण्याची तारीख ८ ऑक्टोबर आहे. एकापेक्षा अधिक उमेदवार असल्यास १८ ऑक्टोबर रोजी मतदान होईल. १९ रोजी निकाल जाहीर होईल.