जयपूर - राजस्थानमधील सत्ता संघर्ष अद्यापही सुरूच आहे. या सत्ता संघर्षात दररोज नव्या घटना घडत असल्याचं समोर येत आहे. सुरुवातीला मुख्यमंत्री अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट असा संघर्ष सुरू झाला. त्यानंतर तो राजभवन, उच्च न्यायालयापाठोपाठ सर्वोच्च न्यायालयातही पोहोचला. याच दरम्यान भाजपानेकाँग्रेसवर निशाणा साधला आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते गजेंद्रसिंह शेखावत यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
राजस्थानातील गेहलोत सरकार आपल्या गटातील आमदारांचेच फोन टॅप करत असल्याचा आरोप शेखावत केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे. तसेच गेहलोत यांनी प्रदेश काँग्रेसच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले आहे. तर जैसलमेरच्या हॉटेलमध्ये बंद असलेल्या आमदारांचे फोन टॅपिंग, इंटरकॉम टॅपिंग करण्यात येत आहे. याशिवाय हॉटेलमध्ये मोबाईल जॅमर देखील लावण्यात आला असल्याचं शेखावत यांनी म्हटलं आहे.
"निवडून आलेल्या आमदारांना शेळ्या, मेंढ्यासारखं हाकललं जात आहे. आमदारांना धमकावलं जात आहे, त्यांच्यावर देखरेख ठेवून त्यांचे फोन टॅप केले जात आहेत" असं गजेंद्रसिंह शेखावत यांनी म्हटलं आहे. यासोबतच "आमदारांवर पाळत ठेवून लोकशाही वाचवण्याच्यासाठी गेहलोत कोणतं नाटक करत आहेत?" असा सवाल देखील त्यांनी केला आहे. "आपापसात अविश्वास असेल तर मग सरकार राजस्थानात अस्तित्त्वात नाही हे स्पष्ट आहे. केवळ एका व्यक्तीच्या सत्तेच्या लोभासाठी हुकूमशाही चालू आहे" असा आरोप शेखावत यांनी केला आहे.
गेहलोत यांच्या गटातल्या आमदारांना जयपूरहून जैसलमेरला पाठवण्यात आलं. काही दिवसांपूर्वी गेहलोत यांनी काँग्रेसचं सरकार पाडण्यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरू असून त्यासाठी घोडेबाजार केला जात आहे, असा आरोप केला होता. मोदींनी राज्यात सुरू असलेला तमाशा बंद करावा, असं आवाहन त्यांनी केलं होतं. 'भाजपाच्या प्रतिनिधींकडून सुरू असलेला आमदार खरेदीचं कारस्थान अतिशय मोठं आहे. ते इथे कर्नाटक, मध्य प्रदेशची पुनरावृत्ती करू पाहत आहेत. संपूर्ण गृह मंत्रालय याचसाठी काम करत आहे,' असा आरोप गेहलोत यांनी केला होता. त्यानंतर आता शेखावत यांनी गेहलोत सरकारवर आरोप केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
'हिंदू सत्तेत असतील तरच मंदिरं वाचतील, धर्म सुरक्षित राहील'; भाजपा नेत्याचं विधान
Breaking: रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट जैसे थे; आरबीआयकडून EMI सवलतीवर सस्पेन्स कायम
CoronaVirus News : काय सांगता? रेनकोट समजून चोरलं पीपीई किट अन् झालं असं काही...