Rajasthan Political Crisis: सचिन पायलट यांच्यासोबत आमदार किती? नवा व्हिडीओ जारी करत केला दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 08:51 AM2020-07-14T08:51:14+5:302020-07-14T15:13:58+5:30

Rajasthan Political Crisis: व्हिडीओत आमदार इंद्रराज गुर्जर, मुकेश भाकर, हरीश मीणा दिसत आहेत. हा व्हिडीओ ट्विट करत पर्यटन मंत्री विश्वेंद्र सिंह यांनी फॅमिली असा उल्लेख केला आहे

Rajasthan Political Crisis: How many MLA with Sachin Pilot? Claiming to be releasing a new video | Rajasthan Political Crisis: सचिन पायलट यांच्यासोबत आमदार किती? नवा व्हिडीओ जारी करत केला दावा

Rajasthan Political Crisis: सचिन पायलट यांच्यासोबत आमदार किती? नवा व्हिडीओ जारी करत केला दावा

Next
ठळक मुद्देकाँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत १२२ पैकी १०६ आमदार सहभागी झाल्याचा दावा मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केलं होतं शक्तीप्रदर्शन बहुमत असेल तर सभागृहात सिद्ध करा, मुख्यमंत्री बंगल्यावर नको, पायलट समर्थकांचे आव्हान

नवी दिल्ली – राजस्थानात सुरु असलेल्या राजकीय संघर्षादरम्यान सचिन पायलट समर्थकांकडून एक व्हिडीओ  जारी करण्यात आला आहे. या व्हिडीओत पायलट समर्थक १६ आमदार एकत्र बसल्याचं दिसत आहे. सोमवारी दुपारी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी काँग्रेस आमदारांचे शक्तीप्रदर्शन केल्यानंतरचा हा व्हिडीओ असल्याचं सांगितलं जात आहे.

मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत १२२ पैकी १०६ आमदार सहभागी झाल्याचा दावा केला होता. १० सेकंदाचा हा व्हिडीओ सचिन पायलट यांच्या ऑफिशियल व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकण्यात आला. या व्हिडीओत सचिन पायलट दिसत नसले तरी १६ आमदार एकत्र बसल्याचं दिसत आहे. व्हिडीओत अन्य ६ लोकही आहेत त्यांची ओळख पटली नाही.

व्हिडीओत आमदार इंद्रराज गुर्जर, मुकेश भाकर, हरीश मीणा दिसत आहेत. हा व्हिडीओ ट्विट करत पर्यटन मंत्री विश्वेंद्र सिंह यांनी फॅमिली असा उल्लेख केला आहे. मुकेश भाकर यांनी सांगितले की, काँग्रेसशी प्रामाणिकपणा याचा अर्थ अशोक गहलोत यांची गुलामी आहे, हे आम्ही सहन करणार नाही. यादरम्यान, सचिन पायलट यांनी दावा केला आहे की, त्यांच्याकडे ३० काँग्रेस आमदारांचे समर्थन आहे. काही अपक्ष आमदारही सचिन पायलट यांच्यासोबत आहेत. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा दावा फेटाळत जर सरकारकडे बहुमत असेल तर त्यांनी सभागृहात ते सिद्ध करावं. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर नाही असं सचिन पायलट यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी म्हटलं आहे.(Rajasthan Political Crisis)

सूत्रांच्या माहितीनुसार सचिन पायलट लवकरच भाजपात सहभागी होऊ शकतात. राजस्थानात एकूण २०० आमदारांपैकी काँग्रेसचे १०७ आमदार आहेत. भाजपाकडे ७२ आमदार आहेत, काँग्रेसचा दावा आहे की, त्यांना १३ अपक्ष, सीपीएम २, भारतीय ट्रायबल पार्टी आणि राष्ट्रीय लोकदल यांच्या प्रत्येकी एका आमदाराचे पाठबळ आहे.

राजस्थानात काय घडतंय?

उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यासह काही आमदारांना फोडून अशोक गेहलोत यांचे काँग्रेस सरकार खाली खेचण्याच्या भारतीय जनता पार्टीच्या कथित ‘कारस्थाना’च्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या अस्थिरतेत पहिली बाजी मुख्यमंत्री गेहलोत यांनी जिंकल्याचे चित्र सोमवारी दिसले. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत गेहलोत यांच्या नेतृत्वावर संपूर्ण विश्वास व्यक्त करणारा व सरकार अस्थिर करण्याचे भाजपाचे मनसुबे हाणून पाडण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.(Rajasthan Political Crisis) जे कोणी काँग्रेसचे नेते अथवा आमदार सरकार अस्थिर करण्याचाप्रयत्न करत असतील किंवा यापुढे करतील त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा आग्रह विधिमंडळ पक्षाच्या बैठकीतील ठरावात करण्यात आला. पण त्यात पायलट यांचा मात्र नावाने उल्लेख टाळण्यात आला. याच दृष्टीने, ह्यपक्षातील मतभेद पक्षातच मिटविले जातील. सर्वांसाठी दारे खुली आहेत, असे सांगायला रणदीप सिंग सूरजेवाला विसरले नाहीत.

Web Title: Rajasthan Political Crisis: How many MLA with Sachin Pilot? Claiming to be releasing a new video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.