जयपूर: राजस्थानमध्ये बंडखोरी करणारे सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्यावर काँग्रेसने हकालपट्टीची कारवाई केली आहे. त्यांना उपमुख्यमंत्रिपद आणि प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवलं आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याविरोधात सचिन पायलट यांनी नाराजीचं बंड पुकारलं, त्यानंतर काँग्रेसने भाजपावर आरोप करत सरकार अस्थिर करण्यासाठी पडद्यामागून हालचाली करत असल्याचा आरोप केला आहे. (Rajasthan Political Crisis) मात्र सचिन पायलट यांनी भाजपात प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सचिन पायलट यांच्या या विधानानंतर अशोक गहलोत यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
अशोक गहलोत प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, देशात घोडेबाजार सुरु आहे. 20-20 कोटींना आमदारांना खरेदी केलं जात आहे. नवी पिढी हे सगळं बघत आहे. भाजपाकडून लोकशाही संपवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप अशोक गहलोत यांनी केला आहे.
सचिन पायलट यांनी आईला न सांगताच विमान उडवण्याचं लायसन्स मिळवलं होतं, पण...
अशोक गहलोत पुढे म्हणाले की, नव्या पीढीवर आमचं प्रेम, येणारे दिवस त्यांचेच आहेत, आमचे सहकारी भाजपाच्या जाळ्यात फसले. भाजपाने कर्नाटक, मध्य प्रदेशसारखा खेळ राजस्थानात रचला असल्याचा दावा अशोक गहलोत यांनी केला आहे.
चांगली इंग्रजी बोलणे, माध्यमांना चांगले बाइट देणे आणि सुंदर, देखणे दिसणे या सर्व गोष्टी काही उपयोगाच्या नाही. देशाबद्दल आपल्या मनात काय आहे, आपली विचारधारा, धोरणं आणि वचनबद्धता काय आहे, कशी आहे, या सर्व गोष्टी विचारात घेतल्या जातात असं असं देखील अशोक गहलोत यांनी सांगितले.
तत्पूर्वी, सचिन पायलट एनडीटिव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, मी अशोक गहलोत यांच्यावर नाराज नाही किंवा मी जास्त काही मागितलंही नाही. काँग्रेसने राजस्थानमधील जनतेला निवडणुकीवेळी जी आश्वासने दिली होती ती पूर्ण करावीत इतकीच माझी इच्छा होती. आम्ही वसुंधरा राजे यांच्याविरोधात प्रचार केला होता. अवैध माइनिंग प्रकरणात काँग्रेसचं सरकार आल्यानंतरही काही केले नाही. अशोक गहलोत त्यांच्या मार्गाने चालले होते.
गेल्या वर्षी राजस्थान उच्च न्यायालयाने पूर्वीचा निर्णय बदलून वसुंधरा राजे यांना बंगला रिकामा करण्यास सांगितले, परंतु अशोक गहलोत सरकारने हा निर्णय लागू करण्याऐवजी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. एकीकडे अशोक गहलोत हे माजी मुख्यमंत्र्यांना मदत करत आहेत आणि दुसरीकडे ते मला आणि माझ्या समर्थकांना राजस्थानच्या विकासात काम करण्याची संधी देत नाहीत. माझ्या आदेशाचे पालन करू नका, फाइल्स माझ्याकडे पाठवू नका असे अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. काही महिन्यांपासून विधिमंडळ पक्ष किंवा मंत्रिमंडळाची बैठक होत नाही. मी लोकांना दिलेली आश्वासने पूर्ण करू शकत नाही तर अशा पदाचा काय उपयोग, असं सचिन पायलट यांनी सांगितले.
भाजपासोबत मिळून सरकार पाडण्याचा प्रयत्न करीत होता असा आरोप अशोक गहलोत यांनी केला होता. यावर या दाव्यांमध्ये काही तथ्य नसल्याचे सचिन पायलट यांनी स्पष्ट केले आहे. राजस्थानमध्ये कॉंग्रेसला जिंकण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे, मी पक्षाच्या विरोधात काम का करणार असं सचिन पायलट यांनी स्पष्ट केले आहे.