Rajasthan Political Crisis: राजस्थानच्या उपमुख्यमंत्रिपदावरून सचिन पायलट यांची हकालपट्टी; काँग्रेसचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 01:47 PM2020-07-14T13:47:40+5:302020-07-14T14:21:20+5:30

Rajasthan Political Crisis: सचिन पायलट यांना राजस्थानच्या प्रदेशाध्यक्ष पदावरूनदेखील हटवलं

Rajasthan Political Crisis Sachin Pilot removed as Deputy Chief Minister congress takes action | Rajasthan Political Crisis: राजस्थानच्या उपमुख्यमंत्रिपदावरून सचिन पायलट यांची हकालपट्टी; काँग्रेसचा मोठा निर्णय

Rajasthan Political Crisis: राजस्थानच्या उपमुख्यमंत्रिपदावरून सचिन पायलट यांची हकालपट्टी; काँग्रेसचा मोठा निर्णय

Next

जयपूर: राजस्थानमध्ये सत्ता टिकवण्यासाठी संघर्ष (Rajasthan Political Crisis) करणाऱ्या काँग्रेसनं मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांना बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान देणाऱ्या सचिन पायलट (Sachin Pilot) यांची उपमुख्यमंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्या तीन समर्थक आमदारांची मंत्रिपदंदेखील काढून घेण्यात आली आहेत. उपमुख्यमंत्रिपदासह प्रदेशाध्यक्ष पदावरूनही पायलट यांना हटवण्यात आलं आहे. त्यांच्याऐवजी गोविंद सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही माहिती दिली आहे. 




सरकारविरोधात बंड करणाऱ्या सचिन पायलट आणि त्यांच्या समर्थक आमदारांविरोधात काँग्रेसनं कठोर कारवाई केली आहे. पायलट यांना उपमुख्यमंत्रिपदासह प्रदेशाध्यक्ष पदावरूनही हटवण्यात आलं आहे. तर त्यांच्या समर्थक आमदारांची मंत्रिपदं काढून घेण्यात आली आहेत. काँग्रेस आमदारांच्या बैठकीनंतर प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी याबद्दलची माहिती दिली. 'पूर्ण बहुमतानं निवडून आलेलं सरकार पाडण्यामागे भाजपाचं षडयंत्र आहे. सत्ता आणि पैशांचा वापर करून, ईडी आणि आयकर विभागाकडून दबाव आणून सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस आमदारांना पैसे देऊन खरेदी करण्याचा प्रयत्न होत आहेत. भाजपानं सरकार पाडण्यासाठी रचलेल्या कारस्थानात पायलट अडकले आणि त्यांनी जनतेनं निवडून दिलेल्या सरकारला धक्का लावण्याचा प्रयत्न केला,' अशा शब्दांत सुरजेवाला यांनी पायलट आणि भाजपा यांचा समाचार घेतला.

सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रिपदावरून दूर करतानाच त्यांच्या समर्थक आमदारांवरही पक्षानं कारवाई केली आहे. विश्वेंद्र सिंह आणि रमेश मीणा यांना मंत्रिपदावरून काढून टाकण्यात आलं आहे. 'आम्ही गेल्या ७२ तासांपासून सचिन पायलट यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहोत. राहुल गांधी यांच्या माध्यमातून सोनिया गांधींनी पायलट यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला गेला. के. सी. वेणुगोपाल त्यांच्याशी अनेकदा बोलले. त्यांना परत आणण्याचे प्रयत्न झाले. पक्षाचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले असल्याचं सांगण्यात आलं. काही मतभेद असल्यास संवादाच्या माध्यमातून सोडवता येईल, असं आवाहन करण्यात आलं. मात्र त्याचा कोणताही उपयोग झाला नाही,' असं सुरजेवाला यांनी सांगितलं.

पायलट आणि त्यांचे समर्थक आमदार राजस्थानातील काँग्रेस सरकार पाडण्याच्या प्रयत्नात असल्याचा गंभीर आरोप सुरजेवाला यांनी केला. पायलट करत असलेली कृती स्वीकारार्ह नाही. त्यामुळे आम्हाला अतिशय दु:खद अंतकरणानं काही निर्णय घ्यावे लागले, असं म्हणत सुरजेवाला यांनी पायलट आणि त्यांच्या समर्थक आमदारांवर करण्यात आलेल्या कारवाईची माहिती दिली.

Read in English

Web Title: Rajasthan Political Crisis Sachin Pilot removed as Deputy Chief Minister congress takes action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.