जयपूर : गेल्या दहा दिवसांपासून राजस्थानमध्ये सुरु असलेल्या राजकीय संघर्षात आजचा दिवस महत्वाचा आहे. राजस्थान काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यासह १८ आमदारांना विधानसभेच्या सदस्यत्वापासून अपात्र ठरवण्यासंबंधी नोटीस बजावली आहे. या विरोधात राजस्थान हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सकाळी १०.३० सुनावणी होणार आहे.
सचिन पायलट यांच्यासह १८ काँग्रेसच्या बंडखोर आमदारांना विधानसभा सभापतींकडून अपात्रतेच्या नोटीसला आव्हान देणार्या या याचिकेवर आज हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश इंद्रजीत महंती आणि न्यायाधीश प्रकाश गुप्ता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होईल. त्यानंतर या याचिकेवर निकाल देण्यात येईल. मात्र, प्रतिवादींच्या यादीमध्ये केंद्र सरकारचा समावेश करण्यासाठी सचिन पायलट गटाने गुरुवारी कोर्टात अर्ज दाखल केला आहे. जर, या अर्जावर सुनावणी झाली तर निकाल येण्यास आणखी काही वेळ लागू शकेल.
सचिन पायलट आणि काँग्रेसच्या बंडखोर १८ आमदारांनी गेल्या आठवड्यात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. ही याचिका दाखल करताना सचिन पायलट गटाने सभापती सी. पी. जोशी यांच्या अपात्रतेच्या नोटीसला आव्हान दिले. राजस्थान हायकोर्टात मुख्य न्यायाधीश इंद्रजित महंती आणि न्यायाधीश प्रकाश गुप्ता यांच्या खंडपीठाने यावर सुनावणी केली. दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर मंगळवारी हा निकाल २४ जुलै पर्यंत राखून ठेवण्यात आला.
दरम्यान, राजस्थान काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकांना सचिन पायलट यांच्यासह त्यांचे 18 समर्थक आमदार गैरहजर राहिले. त्यांचे हे कृत्य पक्षविरोधी मानून पायलट यांच्यासह 18 आमदारांना विधानसभा अध्यक्ष सी. पी.जोशी यांनी अपात्र ठरवण्याची नोटीस बजावली. त्याला सचिन पायलट गटाने राजस्थान हायकोर्टात आव्हान दिले असून काँग्रेस सदस्य म्हणून मतदान करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे.
आणखी बातम्या...
"छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला असता तर तिथेच राजीनामा दिला असता"
बापरे! पत्नीचे 14 जणांसोबत शारीरिक संबंध; पतीने पाठवली सर्वांना कायदेशीर नोटीस अन्...
राम मंदिराचे भूमिपूजन अशुभ मुर्हूतावर? शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वतींकडून प्रश्नचिन्ह
जोपर्यंत शाळा बंद आहेत, तोपर्यंत फी नाही; गुजरात सरकारचा पालकांना दिलासा
मृत्यूनंतरही आठ लोकांसाठी ठरला फरिश्ता; २७ वर्षीय तरुणाचे अवयवदान