नवी दिल्ली : राजस्थानमधील काँग्रेसचे बंडखोर नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ज्या लोकांनी मेहनत घेतली आहे, त्यांचा सरकारमध्ये समावेश असावा. लढा हा पदासाठी नव्हता, तर स्वाभिमानासाठी होता. जर पार्टी पद देऊ शकते, तर पार्टी पद घेऊही शकते. जे आश्वासन सत्तेत येण्यासाठी केले होते, ते पूर्ण करणार, असे सचिन पायलट यांनी सांगितले. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांतील राजस्थानमधील राजकीय घडामोडींनंतर पहिल्यांदाच सचिन पायलट यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
याचबरोबर, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी सविस्तर चर्चा केल्यानंतर मी खुश आहे. सर्मथक आमदारांचे म्हणणे, त्यांच्यासमोर मांडले. त्यानंतर मला आश्वासन देण्यात आले की, त्रिसदस्यीय समिती लवकरच या सर्व मुद्यांवर समाधानकारण निर्णय घेईल. हे सर्व मुद्दे सैद्धांतिक होते, असे सचिन पायलट यांनी सांगितले.
याशिवाय, सचिन पायलट म्हणाले की, "पार्टी पद देऊ शकते, तर पार्टी पद घेऊही शकते. मला पदाची लालसा नाही. मात्र, मला वाटते की, आपण आदर, सन्मान आणि स्वाभिमान याबद्दल बोलत होतो, ते कायम राहिले पाहिजे. ज्यांच्या मेहनतीमुळे सरकार स्थापन झाले आहे, त्या लोकांचा सहभाग केला पाहिजे. माझी तक्रार सोडवली जाईल."
दरम्यान, सचिन पायलट यांनी सोमवारी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेतली. या तिघांमध्ये झालेली ही भेट सकारात्मक झाल्याचे समजते. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.