नवी दिल्ली : राजस्थानमध्ये यावर्षी अखेरीस विधानसभा निवडणुकांचे (Rajasthan Assembly Election 2023) रणशिंग फुंकले जाणार आहे. राजस्थानात सत्तापालट करण्यासाठी भाजपकडून (BJP) जोरदार तयारी करण्यात येत आहे. राजस्थानमध्ये यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजने मोठी खेळी केली असून आठ जिल्ह्यांचे अध्यक्ष बदलले आहेत. यासोबतच जयपूरमध्ये भाजपची दोन दिवसीय प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठकही सुरू आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) हे आज (२३ जानेवारी) संध्याकाळी राज्य कार्यकारिणीच्या बैठकीला संबोधित करणार आहेत. भाजपने विजय आचार्य यांची बिकानेर शहराच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे, तर जलमसिंह भाटी यांच्याकडे बिकानेर ग्रामीण भागाची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय, भाजपने उम्मेद सिंह भाया यांना अलवर उत्तर, अशोक गुप्ता यांना अलवर दक्षिण, ऋषी बन्सल यांना भरतपूर, सुशील दीक्षित यांना सवाई माधोपूर, स्वरूप सिंह यांना खारा बाडमेर आणि बाबू सिंह राजगुरू यांना बालोत्राचे जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.
राजस्थान विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने ज्या जिल्ह्यांचे अध्यक्ष बदलले आहेत, ते जिल्हे पक्षासाठी नेहमीच महत्त्वाचे राहिले आहेत. यावेळी भाजपने या जिल्ह्यांमध्ये जातीय समीकरणाची पूर्ण काळजी घेत मते मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. बिकानेरमधील राजपूत व्होट बँक वळवण्याच्या इराद्याने राजकीय समीकरणे हाताळण्यात माहीर असलेल्या जलमसिंह भाटी यांच्यावर भाजपने मोठी जबाबदारी दिली आहे.
राजस्थानमधील सत्ताबदलावर भाजपची नजरदरम्यान, गेल्या तीन दशकांपासून राजस्थानच्या राजकारणात एक ट्रेंड तयार झाला आहे आणि दर पाच वर्षांनी सत्ता बदलते. भाजप पुन्हा एकदा हा ट्रेंड कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे. 2018 च्या निवडणुकीत काँग्रेस पुन्हा पाच वर्षांनी सत्तेत परतली आणि अशोक गेहलोत (Ashok Gehlot)पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनले. त्यामुळे राजस्थानमधील राजकरणाचा ट्रेंड कायम राहतो की, येथील जनतेकडून अशोक गेहलोत यांच्या सरकारला पुन्हा संधी दिली जाणार? हे पाहावं लागणार आहे. राजस्थानची विधानसभा निवडणूक डिसेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ मध्ये होणार आहे.