नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेले अशोक गेहलोत यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकी रणधुमाळीत राजस्थानच्या मुख्यमंत्री बदलाचे वारेही जोराने वाहू लागले आहेत. यानंतर आता काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी लॉबिंग सुरू केले आहे. यासाठी ते जयपूरला रवाना झाले असून, आमदारांशी संपर्क वाढवला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे 'एक व्यक्ती, एक पद' ही भूमिका समोर आल्यानंतर अशोक गेहलोत यांनी मुख्यमंत्रीपद सोडून काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. तेव्हापासून राजस्थानच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे. राजकीय चर्चांवर विश्वास ठेवला तर गेहलोत मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतरच काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची तयारी करू शकतात. तर, तिकडे सचिन पायलट मुख्यमंत्रीपदासाठी जोर लावत आहेत.
जयपूर ते दिल्ली चर्चाकाँग्रेस अध्यक्ष निवडीबाबत जयपूरपासून नवी दिल्लीपर्यंत चर्चा सुरू आहे. अशोक गेहलोत यांच्या हाती काँग्रेसचे नेतृत्व येणार का? अध्यक्ष झाल्यानंतर गेहलोत मुख्यमंत्रीपदातून मुक्त होतील का? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. नुकतेच सचिन पायलट एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. तेव्हा येथील पत्रकाराने पायलटांना विचारले की, 'मी राजस्थानच्या पुढच्या मुख्यमंत्र्यांशी बोलतोय का?’ पायलटने हसत हसत उत्तर दिले की, 'भविष्यात काय होईल हे मला माहीत नाही, पण काँग्रेस अध्यक्षांच्या निवडणुका येत आहेत. निर्णय पक्षा नेतृत्व ठरवेल.'