Arvind Kejriwal On Rajasthan Political Crisis:काँग्रेस अध्यक्षपदावरुन राजस्थानमध्ये राजकीय संकट निर्माण झाले आहे. अशोक गेहलोत आणि सचिन पायलट पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्यास गेहलोतांच्या 80 पेक्षा जास्त समर्थक आमदारांनी आक्षेप घेत विधानसभा अध्यक्षांकडे सामूहिक राजीनामा सुपूर्द केला आहे. काँग्रेसच्या या पक्षांतर्गत कलहावर आपचे राष्ट्रीय संजोयक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टोला लगावला आहे.
अरविंद केजरीवाल यांनी राजस्थानच्या घडामोडींवर भाष्य करताना काँग्रेसला टोला लगावला. 'काँग्रेसला स्वतःचे घर सांभाळता येत नाही,' असा टोला त्यांनी लगावला. तसेच, 'दोन्ही पक्ष (काँग्रेस आणि भाजप) फोडा-फोडीचे राजकारण करतात आणि आमच्या मोफत योजनांवर टीका करतात. आज संपूर्ण देशाला आम आदमी पक्षाकडून आशा आहेत. आम्ही शाळा-रुग्णालये बांधली, जनतेची कामे केली. जनतेला हव्या त्या गोष्टी आम्ही करतो,' असेही केजरीवाल म्हणाले.
केजरीवाल पुढे म्हणतात, 'आम्ही फक्त कामाचे राजकारण करतो, त्यामुळे दिल्ली आणि पंजाबमध्ये आमचे सरकार स्थापन झाले. आता गुजरातमधील जनताही आपचे सरकार स्थापन केल्याशिवाय राहणार नाही.' सीएम केजरीवाल यांना विचारण्यात आले की, तुम्ही संपूर्ण देशात काँग्रेसचा पर्याय म्हणून स्वत:ला सादर करत आहात का? त्यावर केजरीवाल म्हणाले, 'मी स्वतःला पर्याय समजत नाही. आम्हाला फक्त देशाला पुढे न्यायचे आहे.'