नवी दिल्ली - देशातील ४ राज्यांमध्ये राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. त्यानंतर आता मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. यात राजस्थानाचा निकाल समोर आला आहे. राजस्थानात काँग्रेसनं ३ जागांवर विजय मिळवला आहे. तर भाजपाने एक जागा जिंकली आहे. काँग्रेसकडून रणदीप सुरजेवाला, मुकुल वासनिक आणि प्रमोद तिवारी हे तिघंही राज्यसभेवर पोहचले आहेत. तर भाजपाचे घनश्याम तिवारी विजयी झाले आहेत.
राजस्थानच्या या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून सुभाष चंद्रा उभे होते. परंतु त्यांचा पराभव झाला आहे. राजस्थानात भाजपाच्या एका आमदाराने पक्षाच्याविरोधात जात काँग्रेस उमेदवाराला मत दिले. आमदार शोभारानी कुशवाह यांनी काँग्रेसच्या प्रमोद तिवारी यांना मत दिले. आता दिल्ली पार्टी हायकमांडने राजस्थान भाजपा आमदारांच्या क्रॉस वोटिंगवर प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांच्याकडे रिपोर्ट मागितला आहे. वासनिक यांच्या विजया मुळे बुलडाण्यातील जयस्तंभ चौकात काँग्रेसच्या वतीने फटाके फोडून तसेच पेढा वाटत जल्लोष साजरा करण्यात आला आहे.
राजस्थानमधील विजयानंतर काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी ट्विट करून पक्षाच्या उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. ट्विटमध्ये म्हटलंय की, राज्यात झालेल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे ३ उमेदवार मुकुल वासनिक, रणदीप सुरजेवाला आणि प्रमोद तिवारी विजयी झाले असून त्यांना हार्दिक शुभेच्छा. राजस्थानात भाजपा उमेदवार घनश्याम तिवारी यांना ४३ मते पडली तर अपक्ष उमेदवार सुभाष चंद्रा यांना ३० मते पडली. काँग्रेसच्या रणदीप सुरजेवाला यांना ४३, मुकुल वासनिक ४२ तर प्रमोद तिवारी यांना ४१ मते पडली.
महाराष्ट्र आणि हरियाणात मतमोजणी खोळंबलीमहाराष्ट्र आणि हरियाणा येथे निवडणूक मतदान प्रक्रियेवर आक्षेप घेत सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांच्या मतदारांवर आरोप लावले आहेत. मतदानावेळी सीक्रेसी एक्टचं भंग केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. महाराष्टात महाविकास आघाडीचे जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांच्याविरोधात भाजपाने आक्षेप घेतला आहे त्यामुळे याचा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पोहचला आहे. सध्या केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्र आणि हरियाणा यांच्याकडून आलेल्या तक्रारींची चौकशी करत आहे. रात्री उशीरापर्यंत यावर निर्णय येऊ शकतो.