जयपूर - राजस्थानमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आता विजयासाठी रणनीती आखण्याची तयारी सुरू झाली आहे. काँग्रेसनं या निवडणुकीसाठी खूप सतर्कता बाळगली आहे. आमदारांना एकजूट ठेवण्यासाठी उदयपूरच्या एका हॉटेलमध्ये शिफ्ट केले. राज्यसभा निवडणुकीसाठी घोडेबाजार होण्याची भीती काँग्रेस नेत्यांना आहे. त्यामुळे पक्षाच्या आमदारांना एकत्रित ठेवण्याचा प्लॅन नेत्यांनी बनवला आहे. येत्या १० जूनला राज्यसभा निवडणूक होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या सर्व आमदारांना हायकमांडनं उदयपूरला पोहचण्याचे आदेश दिलेत. काही आमदार बुधवारीच उदयपूरमध्ये दाखल झाले. तर काही आज होण्याची शक्यता आहे. काँग्रेस आमदारांसोबत, अपक्ष आणि अन्य छोट्या पक्षाचे आमदारही जे काँग्रेसला समर्थन करणार आहेत. त्यांनाही उदयपूरच्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे अशी माहिती एका काँग्रेस नेत्याने दिली. विशेष म्हणजे राज्यसभा उमेदवारीचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उद्योगपती सुभाष चंद्रा यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे काँग्रेस पक्षात खळबळ माजली. सुभाष चंद्रा यांना भाजपा आणि आरएलपी यांनी आधीच समर्थन दिले आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण काँग्रेस समर्थक आमदार फुटण्याची भीती काँग्रेस नेत्यांना आहे. त्यामुळे कुठलाही दगाफटका होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे.
काँग्रेसनं राज्यसभेसाठी मुकुल वासनिक, रणदीप सुरजेवाला आणि प्रमोद तिवारी यांना मैदानात उतरवलं आहे. तर भाजपाने माजी मंत्री घनश्याम तिवारी यांना उमेदवारी दिली आहे. अपक्ष म्हणून सुभाष चंद्रा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. चंद्रा हे सध्या हरियाणाच्या कोट्यातून खासदार आहेत. १ ऑगस्ट रोजी त्यांचा कार्यकाळ संपत आहे.
काय आहे मतांचे गणित?राज्य विधानसभेत १०८ आमदारांसह सत्ताधारी काँग्रेस ४ पैकी २ जागांवर विजय मिळवू शकते. तर भाजपा १ जागेवर सहज विजयी होईल. या ४ जागांमध्ये एका जागेवर सुभाष चंद्रा यांनी दावा केला आहे. त्यामुळे काँग्रेसची १ जागा अडचणीत आली आहे. काँग्रेसला सुरुवातीला ४१-४१-४१ फॉर्म्युल्याने विजय मिळेल असं वाटत होते परंतु तिसऱ्या जागेसाठी काँग्रेसकडे स्वत:कडे २६ मते आहेत. तिसऱ्या जागेसाठी १५ मतांची पक्षाला आवश्यकता आहे. भाजपाकडे ७१ मते आहेत. त्यांच्याकडे १ जागा जिंकल्यानंतर जास्तीची ३० मते राहतील. त्यामुळे चौथ्या जागेसाठी चुरस निर्माण झाली आहे. विधानसभेत १३ अपक्ष आमदार आहेत. इतर पक्षाचे ८ आमदार आहेत. त्यामुळे राजकीय समीकरणात ही मते कुणाला मिळतात यावर चौथ्या उमेदवाराचं भवितव्य टिकून आहे.