शीलेश शर्मानवी दिल्ली : काँगेसमधील असंतुष्ट नेत्यांना दूर ठेवून नव्या व तरुणांच्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी टाकण्याचे काँग्रेस श्रेष्ठींनी ठरविल्याचे दिसत आहे. त्यासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना दूर करून सचिन पायलट यांना ते पद देण्याचे राहुल गांधी व प्रियांका गांधी यांनी ठरविल्याचे सांगण्यात येत आहे.
राहुल गांधी यांच्या उपस्थितीत गुजरातमधील जिग्नेश मेवाणी व बिहारमधील कन्हय्या कुमार यांचा काँग्रेस प्रवेश होईल. सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्याचे निश्चित झाले आहे. तसे प्रियांका गांधी यांनी पायलट यांना सांगितल्याचे कळते. मात्र हा निर्णय नेमका कधी घेतला जाईल, हे ठरलेले नाही.
तीन नेत्यांनी दिला झटकाजितीन प्रसाद, ज्योतिरादित्य सिंदिया, सुष्मिता देव असे तरुण नेते व त्यांचे समर्थक यांनी गेल्या काही महिन्यांत काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. या तरुण नेत्यांचे महत्त्व ओळखून व काँग्रेस त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहे, हे लक्षात घेऊ न भाजपने त्यांना पदे दिली. त्यामुळेच तरुणांकडे नेतृत्व सोपविले जाणार आहे. कन्हय्या कुमारमुळे बिहार तर जिग्नेश मेवाणी यांच्यामुळे गुजरातमध्ये पक्ष बळकट करण्यास मदत होईल, असा काँग्रेसचा होरा आहे.