नवी दिल्ली - सैन्य दलात भरती होण्यासाठी धावण्याचा सराव करणाऱ्या प्रदीप मेहरा या 17 वर्षीय युवकाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मॅकडॉनल्डमध्ये काम करुन घरी जाताना तो दररोज 10 किमी धावत आपला सरावही करत होता. उत्तराखंडच्या प्रदीपच्या जिद्दीची कथा सर्वांनीच सोशल मीडियातून पाहिली होती. त्यानंतर, आता राजस्थानमधील एका 24 वर्षीय युवकाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या युवकाने सैन्य दलात भरती होण्यासाठी तब्बल 350 किमी धावत प्रवास केला.
राजस्थानच्या सीकर ते राजधानी दिल्लीपर्यंत हा युवक धावत आला होता. हाती तिरंगा झेंडा घेऊन 50 तासांत त्याने 350 किमीचं हे अंतर पार केलं. सुरेश भिंचर असं या युवकाचं नाव असून राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील तो रहिवाशी आहे. सैन्यभरती वेळेत होत नसल्याचा निषेध दर्शविण्यासाठी सुरेशने तब्बल 350 किमी धावत सरकारचे लक्ष्य वेधण्याचा प्रयत्न केला आहे. नागौर, सीकर, झुनझुन या त्याच्या रहिवाशी जिल्ह्यातील युवकांचे वय निघून जात आहे. मात्र, सैन्य भरती निघत नसल्याने त्याने वेगळ्या पद्धतीने हा निषेध नोंदवला.