जयपूर : राजस्थानमध्ये आज विधानसभेचे मतदान होत असून 200 पैकी 199 मतदारसंघांमध्ये मतदान सुरु झाले आहे. अलवर जिल्ह्यातील रामगढ जागेसाठी बसपाचे उमेदवार लक्ष्मण सिंह यांचे निधन झाल्याने या मतदारसंघातील मतदान रद्द करण्यात आले आहे. राज्यात 1951 पासून आतापर्यंत 14 वेळा निवडणुका झाल्या आहेत. यामध्ये चार वेळा भाजपा, एकदा जनता पार्टी आणि 10 वेळा काँग्रेसने सरकार स्थापन केले आहे. मात्र, 1993 नंतरच्या निवडणुकांमध्ये प्रत्येकवेळी सत्तापालट झाला आहे. यामुळे गेल्या 25 वर्षांपासूनचा प्रघात मोडीत निघेल या आशेवर भाजपा तर सत्तापालटाच्या आशेवर काँग्रेस निवडणूक लढवत आहेत .
2013 मधील निवडणुकीमध्ये 58 पक्षांनी निवडणूक लढविली होती. भाजपा सर्व 200, काँग्रेस 195 आणि बसपा 190 जागांवर निवडणूक लढवित आहे. आम आदमी पार्टीने 30 जिल्ह्यांमध्ये उमेदवार उभे केले आहेत. नव्या पक्षांमध्ये जन अधिकारी, हिन्द काँग्रेस. जनतावादी काँग्रेस, भारतीय पब्लिक लेबर, अंजुमन आणि आरक्षणविरोधी पक्षांचा समावेश आहे. यावेळी 88 पक्ष निवडणुकीच्या मैदानात आहेत.
काँग्रेसने भाजपापेक्षा दुप्पट सभा घेतल्या15 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष अमित शहा यांच्यासह भाजपाच्या नेत्यांनी 223 सभा केल्या. यामध्ये मोदी 12, शाह 20 आणि वसुंधरा राजे यांच्या 75 सभा आणि रोड शो आहेत. तर काँग्रेसकडून राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासह काँग्रेस नेत्यांना 433 सभा घेतल्या. यामध्ये राहुल यांनी 9, सचिन पायलट यांनी 230 आणि अशोक गहलोत यांनी 100 सभा घेतल्या.