राजस्थानी मतदारांनी केले राणीचे गर्वहरण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 04:24 AM2018-12-12T04:24:51+5:302018-12-12T06:37:09+5:30

निकालाच्या आदल्या दिवसापर्यंत भाजपाच विजयी होईल आणि आपणच मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊ, अशा गर्वात फिरणाऱ्या वसुंधरा राजे यांचे राजस्थानी मतदारांनी गर्वहरण केले.

Rajasthani voters made queen homage | राजस्थानी मतदारांनी केले राणीचे गर्वहरण

राजस्थानी मतदारांनी केले राणीचे गर्वहरण

Next

- सुहास शेलार

निकालाच्या आदल्या दिवसापर्यंत भाजपाच विजयी होईल आणि आपणच मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊ, अशा गर्वात फिरणाऱ्या वसुंधरा राजे यांचे राजस्थानी मतदारांनी गर्वहरण केले. बेरोजगारी, आरक्षण, कर्जमाफी अशा विविध मुद्द्यांवरून येथील सर्वसामान्य जनता वेळोवेळी रस्त्यावर उतरली. मात्र, राजे सरकारने दडपशाहीच्या मार्गाने ही आंदोलने परतून लावली. त्यामुळे जनसामान्यांमध्ये वसुंधरा राजे सरकारबद्दल नाराजी होती. त्याचा थेट परिणाम मतदानावर दिसून आला.

वसुंधरा राजे यांच्या संमतीशिवाय राजस्थानच्या मंत्रिमंडळातून एकही फाइल पुढे सरकत नव्हती. राजेंव्यतिरिक्त इतर कोणत्याही नेत्याला निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता. या एकछत्री कारभारामुळे ग्रामीण भागातील विकासकामांना मोठ्या प्रमाणात खीळ बसली. साहजिकच याचा जाब सर्वसामान्य जनता सत्ताधारी आमदारांना विचारत होती. त्यामुळे स्वपक्षीय आमदारच राजे यांच्या कारभारावर नाराज होते. त्यामुळे बऱ्याच ज्येष्ठ नेत्यांनी राजेंच्या एकछत्री कारभाराला कंटाळून बंडखोरी केली. यामुळे मतांचे ध्रुवीकरण झाल्याने भाजपावर पराभवाची नामुष्की ओढवली.

२०१३ च्या जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात वसुंधरा राजे यांना अपयश आले. रोजगार, शिक्षणाच्या आधुनिक सुविधा पुरवण्यात असमर्थ ठरल्यामुळे राजस्थानच्या गल्लीगल्लीत नवयुवक ‘मोदी तुझसे बैर नहीं, रानी तेरी खैर नहीं’ अशा घोषणा देत होते. हे जनमनात होते, ते मतदानात परावर्तित झाले.

दुसरीकडे, राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू सरदार सचिन पायलट यांनी गेल्या तीन-चार वर्षांत काँग्रेसच्या तद्दन कार्यपद्धतीत बदल करीत वसुंधरा राजे यांना वेळोवेळी घेरण्यास सुरुवात केली. शिवाय गावागावात फिरत कार्यकर्त्यांचा विश्वास जिंकला. युवकांना काँग्रेसकडे सक्षम पर्याय म्हणून पाहण्यास भाग पाडले. राणीने मात्र पायलट यांच्या या रणनीतीला ‘बचपना’ असेच नाव दिले. काँग्रेसची रणनीती कमी लेखण्याची वृत्ती हेच राणीच्या पराभवाचे मुख्य कारण ठरले. याखेरीज राज्यातील नेतृत्व मोठे ठरल्याने मोदींची खप्पामर्जी, अमित शहा यांना न जुमानण्याची वृत्तीही राजेंना भोवली, हे निकालातून दिसून आले.

तीन कारणांमुळे झाला काँग्रेसचा विजय
बेरोजगारी, आरक्षण, कर्जमाफी अशा विविध मुद्द्यांवरून जनसामान्यांमध्ये भाजपाविषयी असलेली नाराजी.
‘पद्मावत प्रकरणामुळे’ पारंपरिक मतदार राजपूतांनी भाजपाशी फारकत घेत काँग्रेसला दिलेले समर्थन.
भाजपाने केवळ एका मुस्लीम उमेदवाराला तिकीट दिले. शिवाय पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा काढत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने मुस्लिमांची ओढवलेली नाराजी.

Web Title: Rajasthani voters made queen homage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.