जयपूर- देशात महिला सक्षमीकरणाचे जोरदार वारे वाहत असून, आता सकारात्मक बदलही पाहायला मिळतायत. मुंबईतल्या माटुंग्यापाठोपाठ राजस्थानमधल्या गांधीनगर रेल्वे स्थानकातही सर्व कामकाजासाठी महिला कर्मचारी आणि अधिकारी वर्गाची नियुक्ती करण्यात आली आहे.विशेष म्हणजे महिलाराज असलेलं हे रेल्वे स्टेशन आजपासून प्रवाशासांठी खुलं करण्यात आलं आहे. प्रत्येक पोस्टवर महिलांचा वरचष्मा असलेलं हे राजस्थानमधल्या गांधीनगरच दुसरं स्टेशन म्हणून समोर आलं आहे. गांधीनगर स्थानकावर स्टेशन अधीक्षकापासून मुख्य तिकीट कलेक्टरपर्यंत 32 वेगवेगळ्या पदांवर महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या शिपाई आणि स्टेशन मास्टरपासून रिझर्व्हेशन क्लार्कपर्यंतच्या पदांवर महिलांची निवड करण्यात आली आहे.
मुंबईतल्या माटुंगा रेल्वे स्टेशनवरही महिलांचाच वरचष्मामुंबईत मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकातील सर्व कामकाजासाठी महिला कर्मचारी आणि अधिकारी वर्गाची नियुक्ती करण्यात आली आहे. स्थानकाच्या सुरक्षेसाठीही रेल्वे सुरक्षा बलाच्या महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकात ४ फलाट आहेत. माटुंगा स्थानकातील सर्व कामकाज ३० महिला अधिकारी-कर्मचारी एकत्रितपणे चालवत आहेत. यात महिला स्टेशन मास्तरसह ११ बुकिंग क्लार्क, ७ तिकीट तपासनीस, २ मुख्य बुकिंग पर्यवेक्षक, २ उद्घोषणा करणाऱ्या महिला कर्मचारी आणि अन्य कामांसाठी ५ कर्मचारी यांचा समावेश आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी ५ महिला अधिकारी-कर्मचारी रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने तैनात करण्यात आल्या आहेत, अशी माहिती रेल्वे सुरक्षा बलाचे सुरक्षा आयुक्त सचिन भालोदे यांनी दिली होती.महिला सक्षमीकरणासाठी मध्य रेल्वेच्या वतीने नेहमी अत्याधुनिक प्रयोग करण्यात येतात. त्या धर्तीवर माटुंगा स्थानक महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रवाशांकडूनदेखील या उपक्रमाबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. माटुंगा स्थानकाप्रमाणे भविष्यात महिला सक्षमीकरणासाठी मध्य रेल्वे आणखी प्रयत्न करणार आहे, असे मध्य रेल्वेचे नवनियुक्त मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले होते.